वॉशिंग्टन हिंसाचार प्रकरणात शंभर जणांना अटक

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राजधानीत हिंसाचार माजवल्या प्रकरणी एफबीआयने शंभरावर लोकांना शोधून काढून अटक केली आहे. ज्यो बायडेन यांच्या शपथविधीची सध्या तेथे जोरदार तयारी सुरू आहे त्यासाठी हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर विशेष दक्षता घेतली जात असून त्याच अनुषंगाने वॉशिंग्टनमधील हिंसाचारात सहभागी झालेल्यांची धरपकड सुरू आहे.

आणखीही शेकडो लोकांची या संबंधात धरपकड केली जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. बायडेन यांच्या शपथविधीच्या दिवशी असाच प्रकार करण्याचा मनोदय काही ट्रम्प समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मोबाइलवर व सोशल मिडीया चॅटिंगवरही तपास यंत्रणा लक्ष ठेऊन आहेत. असे संशयास्पद दोनशे ट्रम्प समर्थक तपास यंत्रणांनी हेरून ठेवले आहेत. हे लोकही शपथविधीच्या आधीच ताब्यात घेतले जाण्याची शक्‍यता आहे.

हिंसाचार करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या तब्बल 1 लाख 40 हजार टिप्स तपास यंत्रणांना मिळाल्या आहेत. हिंसाचार माजवणाऱ्यांच्या विरोधात एफबीआयने जी धडक कारवाई हाती घेतली आहे त्याबद्दल उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी एफबीआयचे अभिनंदन करून त्यांचे आभारही मानले आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांनी सुरळीत हस्तांतर होण्याची ग्वाही दिली असून नवीन अध्यक्षांचा शपथग्रहण समारंभ विना अडथळा पार पडेल असे ट्रम्प यांनीच नमूद केले असल्याने त्याच अनुषंगाने ही धरपकड सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.