हुंडेकरी यांचे अपहरण अन्‌ सुटकेचे गूढ कायम

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

करीमभाई यांचे ज्या ठिकाणीहून अपहरण झाले, त्या ठिकाणी असलेली दुकाने व त्यांच्याकडील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजमध्ये लाल रंगाची कार दिसत आहे. पण त्यात बसलेल्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.

नगर – शहरातील हुंडेकरी उद्योगसमूहाचे संचालक व उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटे पाचच्या सुमारास सर्जेपुरा चौकात अज्ञान तीन ते चार जणांनी पिस्तुलाच धाक दाखवून अपहरण केले होते. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. हुंडेकरींच्या शोधासाठी पथके रवाना केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास हुंडेकरी यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्याचे समजले.

दुपारी तीन वाजता हुंडेकरी नगरला आल्यानंतर त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या सर्व नाट्यमय घडमोडीनंतर हुंडेकरींचे अपहरण कोणी व कशासाठी केले? जालन्यात कोठे सोडले व कोणी त्यांना जेऊरपर्यंत सोडले, पोलिसांच्या तपासामुळे सोडले की अन्य काही कारण आहे, याबाबत पोलिसांनी मात्र मौन पाळल्याने हुंडेकरी यांच्या अपहरण व सुटकेचे गूढ कायम आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, करीमभाई हुंडेकरी हे दररोज पहाटे त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या मशिदीमध्ये नमाज  पढण्यासाठी जातात. आज पहाटे साडेपाच वाजता ते नेहमीप्रमाणे निघाले असताना पाठीमागून चारचाकी वाहन आले. त्यातून तीन ते चार अज्ञात इसम खाली उतरले. त्यांनी हुंडेकरी यांना पिस्तुलाचा धाक दाखवत गाडीत बसण्यास सांगितले. यावेळी हुंडेकरी यांची अपहरणकर्त्यांबरोबर झटपट झाली. परंतु अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने वाहनात बसविले.

अपहरणकर्त्यांच्या तोंडाला मास्क असल्याने त्यांचे चेहरे हुंडेकरी यांना दिसले नाहीत. हे अपहरणनाट्य सुरू असताना एका महिलेने हा प्रकार पाहिल्याचे सांगण्यात आले. हुंडेकरी यांच्याकडे मोबाईल नव्हता. करीमभाई घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांशी संपर्क केला. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारून मुलाणी, कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने घटनास्थळाची तपासणी केली. ज्या वाहनातूून करीमभाई यांचे अपहरण करण्यात आले, त्या वाहनाच्या पुढील व मागील नंबर प्लेटवर वेगवेगळे क्रमांक होते.

करीमभाई यांच्या अपहरणाची बातमी नगर शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांसह अनेक राजकीय नेत्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. आमदार संग्राम जगताप, महापालिकेचे सभापती मुदस्सर शेख, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी कार्यकर्त्यांनी पोलिसांबरोबर चर्चा करून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्याची विनंती केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी चार पथके स्थापन करून त्यांना चार दिशांना पाठविले.

तसेच शहराची नाकेबंदी करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या तपासाच्या आधारे करीमभाई जालना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तोफखाना, कोतवाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सात पथके जालन्याच्या दिशेने रवाना झाली. मात्र, अपहरणकर्त्यांनी करीमभाई यांना जालन्याच्या बसस्थानकावरच सोडून दिले आणि ते पसार झाले. तेथून करीमभाई नगर तालुक्‍यातील जेऊरपर्यंत आले. तेथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जालन्याच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस पथकाने करीमभाई यांना जेऊर येथील टोलनाक्‍याहून नगरला आले.

मात्र करीमभाई जालन्याहून नगरला कोणाबरोबर आले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. एका नगरसेवकाने त्यांना नगरला आणल्याची चर्चा आहे. दरम्यान, हुंडेकरी हे एसटी बसने नगरला आल्याचे सांगण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता पुण्याला जाणाऱ्या एका बसमध्ये करीमभाई बसलेले आढळले. त्यांना उतरवून पोलिसांच्या वाहनातून नगरला आणले, असे समजते. दरम्यान, आरोपींच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यांची पथके रवाना झाली आहेत.

करीमभाई यांच्याकडून अपहरणकर्त्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. करीमभाई यांचे उद्योजक क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यांचे अपहरण नेमके कोणी आणि कशासाठी केले असावे? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, हुंडेकरी यांचे अपहरण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी केले असावे, असा अंदाजही वर्तवितण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)