नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाने आतापर्यंत देशभरात तब्बल दोन लाखांहून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे.
कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ओळखण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे. बिहारच्या जगदीशपूरमध्ये ही घटना घडली आहे. ममता देवी असे महिलेचे नाव आहे. कोरोनामुळे उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. त्यातच मात्र त्यांच्या नातेवाईकांनी यानंतर पाठ फिरवली.
मृतदेह ओळखण्यास देखील नकार दिला. यामुळेच प्रशासनावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. महिलेच्या मृत्यूची तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. उलट आपला संबंधच नसल्याचे सांगितले.
ममता देवी दुल्हिनगंजमध्ये आपल्या नातेवाईकांकडे राहत होत्या. याच वेळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जगदीशपूरयेथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे नातेवाईक निघून गेले.
उपचारादरम्यान ममता यांना मृत्यू झाला. कोरोना रुग्णालयात दाखल करताना महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांचा फोन नंबर होता. त्यावर फोन करून मृत्यूची माहिती दिली असता, नातेवाईकांनी ओळख दाखवण्यास तसेच मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर प्रशासनानेच महिलेवर अंत्यसंस्कार केले आहेत.