नवी दिल्ली : करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे करोना संसर्गाची भीती सर्वांच्या मनात बसली आहे. देशातील कोरोनाचा भयानक कहर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ४ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होताना दिसून येत आहे.
तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या संख्येमुळे अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार देखील या स्थितीसमोर हतबल झाल्याचं चित्र आहे. मात्र अशा कठीण काळातही माणुसकी जपली जात आहे.
अशातच दिल्लीमध्ये माणुसकीचे जिवंत उदाहरण असल्याची घटना समोर येत आहे. वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीत राहणाऱ्या दांपत्याला कोरोनाची लागण झाली. त्यांचं एक सहा महिन्यांचं बाळही होतं. मात्र या बाळाला सांभाळण्यासाठी कोणीही नव्हतं. अशा वेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पुढाकार घेत त्या बाळाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या पोलीस महिलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचा कामगिरी बद्दल नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.