ऑक्सफर्ड विद्यापिठातील प्रयोगासाठी 20 दशलक्ष पौंडांचे अर्थसहाय्य
लंडन : करोना विषाणूवर प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापिठाने बनवलेल्या औषधाच्या मानवी चाचण्या करायला सुरुवात झाली आहे. या औषधाच्या 80 टक्के यशस्वितेबाबत शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो आहे. या औषधाच्या निर्मिती प्रकल्पासाठी ब्रिटन सरकारने 20 दशलक्ष पौंडांचे अर्थसहाय्य केले आहे. या घातक विषाणूवर औषध तयार करण्यासाठी सरकार हवी ती मदत करायला तयार आहे. असे ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी सांगितले.
या विषाणूवरील औषधाची निर्मिती यशस्वीपणे करणारा देश म्हणून तर आपण सर्वकाही द्यायलाही तयार आहोत, असेही ते म्हणाले.
चाचणी केली जाणारी लस निरुपद्रवी चिंपांझी विषाणूपासून बनविली जाते. चाचणी घेण्यासाठी स्वयंसेवकांना प्रादुर्भाव करण्याच्या हेतूने “जेनेटिकली’ या विषाणूची कृत्रिम निर्मिती केली गेली आहे. या विषाणूचा संसर्ग 18 ते 55 वर्षे वयोगटाच्या सुदृढ व्यक्तींना केला जात आहे. या प्रयोगासाठी स्वतःहून पुढे येणाऱ्या उमेदवारांना 625 पौंड इतका मोबदला दिला जाणार असून असे 500 उमेदवार पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणे अपेक्षित आहे.
ऑक्सफोर्ड लस प्रकल्पाचे नेतृत्व प्राध्यापक सारा गिलबर्ट करत आहेत. त्यांच्यासह रोग प्रतिकारशक्ती आणि मानवी आनुवंशशास्त्राचे काही शास्त्रज्ञांनी मिळून यावर्षी जानेवारीपासून करोना विषाणूवर लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या चार महिन्यापासून या लसीची निर्मिती आणि वेगवेळ्या चाचण्यांसाठी अथक परिश्रम सुरू असून या प्रयोगासाठी पुढे आलेल्या उमेदवारांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या या गटाने म्हटले आहे.