मानवी हक्‍क आयोगाचा गुजर शाळेला दणका

आयोगाच्या तारखेला राहिले गैरहजर


पुणे शिक्षण उपसंचालक, झेडपीचे कार्यकारी अधिकारी, शाळा मुख्याध्यापकांना काढणार नोटीस

बारामती – विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर शाळेच्या पालकांनी शुल्क वाढीबाबत पुणे शिक्षण उपसंचालक, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना कंटाळून मानवी हक्‍क आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्यावर बुधवारी (दि. 19) झालेल्या तारखेला अधिकारी अनुपस्थित राहिल्याने शिक्षण उपसंचालक, कार्यकारी अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस काढण्याचे आदेश दिले असल्याचे पालक सागर उर्फ धनु सस्ते, सचिन जगताप, राहुल गायकवाड व अजय पटेल यांनी सांगितले.

शिक्षण उपसंचालकापासून ते पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारीपर्यंत पत्रव्यवहार, उपोषण, आंदोलने केली मात्र दखल घेतली नाही. अधिकाऱ्यांनी मानवी हक्‍काचा भंग केल्याने पालकांनी थेट मानवी हक्‍क आयोगाकडे दि.25 एप्रिल 2018 रोजी तक्रार दाखल केली. त्याचा खटलान्वये संबंधित उपसंचालक व कार्यकारी अधिकारी यांना बुधवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अधिकारी अनुपस्थित राहिल्याने आयोगाने या दोन्ही अधिकाऱ्यांसमवेत शाळेच्या मुख्याध्यापकांना सुद्धा नोटीस काढून पुढील 23 जुलै 2019 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पालकांनी वेळोवेळी बारामती ते पुणे प्रवास करून उपोषण, घंटानाद आंदोलने करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. शिक्षण उपसंचालक या शुल्क नियंत्रण समितीच्या सदस्या असताना सुद्धा त्यांनी संबंधित शाळेला कोणताही पत्रव्यवहार केला नाही किंवा पालक व शाळेची सुनावणी घेतली नाही. उलट जि.प.शिक्षणाधिकारी यांनी फीसाठी पालकांना तगादा लावू नये म्हणून असे शाळेला पत्र काढूनही शाळेने पालकांना फी भरण्यास नोटीसा दिल्या, विद्यार्थ्यांना वर्गात फी भरण्यासाठी सर्वांसमोर उभे केले. मानवाचे उल्लंघन होईल असे कृत्य शाळा व व्यवस्थापनाने केले आहे.

23 जुलैकडे लक्ष
गेली अडीच वर्षापासून पालक लढा देत आहेत. मात्र, शासन दरबारी कोणतीही दखल घेतली जात नव्हती. बारामती नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते यांनी मानवी हक्‍क आयोगाकडे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार करण्याचे केलेल्या मार्गदर्शनाला यश आले. आता दि.23 जुलै रोजी मानवी हक्‍क आयोग यावर संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.