सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटेना

कापूरहोळ – रविवारची शासकीय सुट्टी आणि लग्नाच्या तिथीमुळे पुणे-सातारा महामार्गावर जागोजागी वाहतूक कोंडी होत होती. चेलाडी-वेल्हा मार्गावर नसरापूर गावात आज बाजार असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. नसरापूरातून पुण्याकडे वळताना चेलाडी फाट्यावर चक्‍का जाम होत होता.

महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत, त्या-त्या ठिकाणी खड्ड्यातून जाताना गाड्यांच्या रांगा लागत होत्या. स्थानिक पोलीस प्रशासन व वाहतूक पोलीस यंत्रणा वाहतूक सुरळीत करीत होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास साताऱ्याकडून पुण्याच्या बाजूला गर्दी वाढली. चेलाडीपासून खुटवड वस्तीपर्यंत महामार्गावर गर्दी होऊन सहा वाजल्यापासून दोन-दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या.

चौकाचौकात वाहनचालक गर्दीतून मार्ग काढण्याच्या प्रयत्न करत होते; परंतु वाहतूक कोंडी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. रस्ता रुंदीकरण होताना वरवे, चेलाडी, सारोळा आदी ठिकाणची उड्डाणपुलांची कामे अर्धवट व रखडलेली आहेत. पडलेला राडारोडा, व्यावसायिकांनी तोडलेले दुभाजक, अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी उपाययोजना नसणे, याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, ठेकेदाराचा मनमानी कारभार यामुळे महामार्गावर प्रवास नको अशी अवस्था प्रवाशांची झाली आहे.

पुलाच्या कामाच्या ठिकाणी एकेरी वाहतुकीमुळे मार्गावर सुट्ट्यांच्या दिवशी वारंवार वाहतूक कोंडी होऊन दोन ते तीन किलोमीटर रांगा लागत आहेत. कापूरहोळ सासवड मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. रविवारी कापूरहोळ चौकात वाहतूक खोळंबली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.