वाई, पाचगणी – भाजप-शिवसेना-आरपीआय आणि मित्र पक्षांचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदन भोसले यांच्या प्रचारार्थ वाई आणि पांचगणी शहरामध्ये काढलेल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
हलगीच्या खणखणाटात, शिंग तुताऱ्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि उदयनराजे भोसले व मदन भोसले यांच्या जयघोषात वाईमधील रॅलीला सोनगिरवाडी येथील जोतिबाचे दर्शन घेऊन सुरूवात झाली. रॅलीमध्ये शिवसेना नेते पुरूषोत्तम जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, भाजपा प्रदेशचे सदस्य अविनाश फरांदे, युवा नेते विकास शिंदे, प्रतागड उत्सव समितीच्या अध्यक्षा विजयाताई भोसले, वाईच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, नगरसेविका वासंती ढेकाणे, सुनिता चक्के, रूपाली वनारसे, सुमैय्या इनामदार, नगरसेवक महेंद्र धनवे, सतिश वैराट, माजी नगरसेवक सचिन फरांदे, दिलीप शिंदे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, भाजपाचे उपाध्यक्ष काशिनाथ शेलार यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप या पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
घोषणांच्या निनादात, सर्वांना अभिवादन करत ही रॅली जुना पुलमार्गे किसन वीर चौक, शिवसेना भवन, यंग रविवार पेठ, जामा मस्जिद येथून फुलेनगर येथे आल्यानंतर येथील आद्य समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला उमेदवार व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
बाबुराव सुर्यवंशी चौक, चावडी चौक, जेैन मंदिर, नगरपालिका, शाहीर चौक, घोटवडेकर हॉस्पिटल, महागणपती मंदिर, नविन पुलमार्गे सिद्धनाथवाडीत ही रॅली आल्यानंतर येथील अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन या रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये ठिकठिकाणी उमेदवार उदयनराजे भोसले आणि मदन भोसले यांचे महिलांकडून औक्षण केले जात होते. या रॅलीच्या मागे असणारी हजारो तरूणांची बाईक रॅली सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.
दरम्यान, पांचगणीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर प्रचंड उत्साह आणि जल्लोषात रॅलीला सुरूवात झाली. या रॅलीमध्ये पांचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, शिवसेनेचे युवानेते नितीनभाई भिलारे, भाजपचे तालुका अध्यक्ष तानाजी भिलारे, टेबल लॅन्ड असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव चोपडे, आरपीआयचे पांचगणी अध्यक्ष जॉन जोसेफ, माजी उपनराध्यक्ष दिलीप बगाडे, सचिन भिलारे, भाजप अध्यक्ष सुरेश साळुंखे, नगरसेवक दिलावर बागवान, उज्ज्वला महाडीक, विठ्ठल बगाडे, प्रविण बोधे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबाजी उंबरकर, पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव भिलारे, किसनराव भिलारे, आरपीआय तालुकाध्यक्ष आतिष भोसले, आरपीआयच्या महिला शहराध्यक्षा अंजली ससाणे, महाबळेश्वर तालुका भाजप महिला अध्यक्षा उषाताई ओंबळे आदी मान्यवर सहभागी होते. ही रॅली शिवाजी चौकात आल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर कमिन्स हायस्कुल जवळ या रॅलीची सांगता झाली.