भोसरी – महाराष्ट्रातील “रेकॉर्ड ब्रेक’ जत्रा “इंद्रायणी थडी’ ला पहिल्या दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर दुपारच्या सत्रात जत्रेला सुमारे 85 हजारांहून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. त्यामुळे शनिवारी व रविवारी जत्रेत झुंबड उडणार, असे चित्र निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा “इंद्रायणी थडी’ गावजत्रा मैदानावर भरविण्यात आली आहे. शिवांजली संखी मंचच्या पुढकाराने भरवलेली ही जत्रा दि.2 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत खुली राहणार आहे.
“इंद्रायणी थडी’ जत्रेचे यंदा दुसरे वर्ष आहे. तब्बल 800 विविध स्टॉल उभारण्यात आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, “रामायण’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा “लेझर शो’, धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, ग्राम संस्कृती, ऐतिहासिक फुले वाडा, रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा, बालजत्रा, शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन, गड-किल्ले यांचे छायाचित्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, फॅशन शो, नृत्य स्पर्धा आदी विविध उपक्रमांसह मनोरंजनाचे विविध खेळ आणि विशेष म्हणजे, तब्बल 300 हून अधिक विविध खाद्यपदार्थांची पर्वणी असलेल्या या जत्रेला नागरिकांचा प्रतिसाद लक्षणीय आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील विविध भागांत आयोजित केल्या जाणाऱ्या “इव्हेंट’पेक्षा भोसरीतील “इंद्रायणी’ थडी गर्दीचे “रेकॉर्ड ब्रेक’ करणार, असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.
वाहतूक आणि सुरक्षा नियंत्रणासाठी 58 जणांची टीम
जत्रेला आलेल्या नागरिकांची आकडेवारी लक्षात यावी. याकरिता सॉफ्टवेअरची मदत घेतली आहे. त्याद्वारे जत्रेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याआधारे सुमारे 85 हजारांहून अधिक नागरिकांनी पहिल्या दिवशी जत्रेला भेट दिल्याचे निदर्शनास आले आहे. वाढती गर्दी लक्षात घेवून वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. याकरिता 58 जणांची “टीम’ कार्यरत करण्यात आली आहे.