मुंबई – आपल्या समाजात सेक्स या विषयावर खुलेपणानं बोललं जात नसलं तरी लॉक डाऊनच्या काळात देशवासीयांनी सेक्स टॉइजची भरभरून खरेदी केली आहे. ही वाढ तब्ब्ल ६५ टक्के इतकी असून याबाबतची आकडेवारी ThatsPersonal.com च्या ‘इंडिया अनकव्हर्ड : इन साइटफुल एनॅलिसिस ऑफ सेक्स प्रोडक्ट्स ट्रेंड्स इन इंडिया’ या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
भारतीय बाजारात कुठल्या सेक्स प्रोडक्टना मागणी आहे? ग्राहकांचा कल काय? याबाबतचे विश्लेषण डोळे विस्फारणारे आहे. सेक्स टॉईजची विक्री करणाऱ्या या संकेतस्थळावर लॉक डाऊनच्या काळात तब्ब्ल २.२ कोटी भारतीयांनी व्हिजिट केलं असून ३ लाख ३५ हजार उत्पादनांची ऑनलाइन विक्री झाली आहे.
प्राप्त आकडेवारीनुसार सेक्स प्रोडक्टच्या या खरेदीमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. त्याखालोखाल कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक येतो. मोठया महानगरांमधील सेक्स प्रोडक्टच्या खरेदीमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर, तर त्याखालोखाल बंगळुरु, दिल्लीचा क्रमांक येतो.
दिल्ली एनसीआरच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात सेक्स प्रोडक्टची २४ टक्के जास्त विक्री झाली. सेक्स प्रोडक्टच्या खरेदीमध्ये पुणेही पहिल्या आठ शहरांमध्ये आहे. सूरत शहरात प्रति ऑर्डरमागे ३,९०० रुपये खर्च केले जातात.
सेक्स टॉइज खरेदी करणाऱ्यांमध्ये २५ ते ३४ वयोगटातला ग्राहकवर्ग जास्त असून महिला दुपारी १२ ते ३ तर पुरुष रात्री ९ ते मध्यरात्रीपर्यंतच्या वेळेत खरेदी करतात असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. विजयवाडा, जमशेदपूर, बेळगाव आणि वडोदरा या शहरात पुरुषांपेक्षा महिला जास्त खरेदी करतात.