स्वच्छ-सुंदर बारामतीचा ‘कचरा’

नगरपालिकेचे दुर्लक्ष; आमराई परिसरासह जिकडे-तिकडे दुर्गंधी

जळोची – बारामती शहरात दर्शनी भागातच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येत असल्याने स्वच्छ-सुंदर हरित बारामतीची ओळख पुसली जात आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते तसेच नागरी वस्तीतील परिसर, ठिकठिकाणच्या मोकळे प्लॉटला कचऱ्याने विळखा घातला असल्याने शहराला बकालपणा आला असून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

शहरातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या आमराई परिसरात तर ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक दिवस या परिसरातील कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या घाणीमुळे नागरिकांबरोबरच लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलून नेण्याऐवजी नगरपालिका ट्रॅक्‍टर आणि जेसीबीच्या साह्याने केवळ विस्कटलेला कचरा एकत्रित करीत पुन्हा त्याच ठिकाणी ढीग करून ठेवत असल्याच येथील नागरिक सांगतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. यावरून नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत किती जागृत आहे हे कळते. कचरा कुंडी मुक्‍त शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येत असल्याने आश्‍वर्य व्यक्‍त केले जात आहे.

परिसरातील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त असून नगरपालिकेवर नाराजी व्यक्‍त करताना दिसून येत आहेत. कमीत कमी लोकवस्तीतील कचरा तरी नियमित साफ केला जावा, अशी परिसरातील कचऱ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांतून मागणी होत आहे.

शहरासह वाढीव हद्दीत ज्या भागात कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. ते उलचण्यात येतील तसेच दोन घंटा गाड्याही वाढवण्यात आल्या आहेत.
– सुभाष नारखेडे, आरोग्य विभाग अधिकारी, बारामती

सुलभ स्वच्छतागृहेही अस्वच्छच –
शहरातील अनेक प्रभागात लाखो रुपये खर्च करुन नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेले सुलभ स्वच्छतागृहेही स्वच्छतेच्या अभावांमुळे अस्वच्छ झालेली आहेत. त्यात कमी की काय म्हणून स्वच्छतागृहाच्या परिसरात अनेक ठिकाणी नेहमीच दुर्गंधीयुक्‍त कचरा पसरलेला असतो. आमराईतील काही भागात तर स्वच्छतागृहापर्यंत जाण्यासाठी अक्षरक्षा कसरत करावी लागत असल्याने नागरिक नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त करीत आहेत.

निर्माण होणार कचरा अन्‌ उचलण्याची सामुग्री – 
दररोज 17 ते 18 टन ओला व 10 ते 11 टन सुका कचरा निर्माण होतो. कचरा संकलनासाठी 33 घंटागाड्या, 05 टॅक्‍टर, 01 टेम्पो, 01 कॉंमप्यक्‍टर, 01 डंपर प्लेसर अशी साधन सामुग्री उपलब्ध असून शहरात कचऱ्याची ढीग साचत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.