पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पाइन रोड येथे जॉगिंग ट्रॅक विकसित करण्याचे काम सुरू आहे. या भागात रविवारी (दि. 5) रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कचऱ्याला आणि झाडांच्या छाटलेल्या फांद्यांना आग लागली. या भीषण आगीमुळे बाजूच्या झाडांना हाय लागली आहे. अशा पद्धतीने वायू प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पाइन रोड येथे भोसरी ते निगडी आणि निगडी ते भोसरी या मार्गाच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिकामी जागा आहे. या जागेत नॅनो बीआरटी प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे प्रलंबित आहे. परंतु त्यावर काम होत नसल्याने महापालिकेच्या वतीने या मोकळ्या जागेत सध्या उद्यान आणि स्थापत्य विभागाकडून जॉगिंग ट्रॅक विकसित करण्याचे काम सुरू आहे. हे काम मागील वर्षापासून सुरू आहे. परंतु साधारण एक किलोमीटर अंतर असणारा जॉगिंग ट्रॅक कित्येक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. मागील महिन्यापासून चेरी चौक ते पवार वस्ती ब्रिजपर्यंतच्या भागात जॉगिंग ट्रॅक करण्यात येत आहे. त्यासाठी ठेकेदाराने या परिसराची साफसफाई करून ट्रॅकचे काम सुरू केले. परंतु कचरा आणि झाडाझुडपांच्या फांद्या एका ठिकाणी गोळा करून ठेवल्याने रविवारी कोणीतरी त्याला आग लावली. त्यामुळे आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर भडकल्या होत्या.
झाडांना लागली हाय
झाडांच्या वाळलेली लाकडे, कचरा एकत्र करून पेटून दिल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना मोठ्या प्रमाणावर हाय लागली आहे. तसेच आगीचे लोट साधारण पंधरा ते वीस फूट उंच उडताना दिसून आले. या आगीमुळे स्पाइन रोडने येणाऱ्या दुचाकीचालकांना दाहकतेचा सामना करावा लागला. स्पाइन रोडने येणाऱ्या वाहनचालकांना अचानक आग लागलेली दिसल्याने वाहनचालक घाबरून जात होते. तसेच आगीतून उडणाऱ्या ठिणग्या वाहनचालकांच्या अंगावर येत होत्या. अशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास करू पाहणाऱ्यांवर कारवाई करावी.
प्रशासनाची टोलवाटोलवी
महापालिकेच्या उद्यान आणि स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. उद्यान विभाग स्थापत्यकडे बोट दाखवत आहे तर स्थापत्यवाले उद्यान विभागाकडे बोट करत आहेत. अशा पद्धतीने कामचुकार अधिकाऱ्यांमुळे ठेकेदार आणि पर्यावरणास घातक कृत्य करणाऱ्यांचे चांगलेच फावताना दिसून येत आहे. अधिकाऱ्यांना माहिती विचारली तर तुम्ही तक्रार दाखल करा मग आम्ही विचारणा करू अशी उत्तरे दिली जात आहेत.
मागील दोन दिवसांपूर्वी देखील येथे आग लागली होती. रविवारी देखील आग लागल्यानंतर नागरिकांनी चिखली अग्निशामक यंत्रणेला फोन केला. आम्ही तात्काळ तेथे जाऊन आग विजवली. परंतु याठिकाणी वाळलेले गवत आणि लाकडे असल्याने कोणीतरी येथे आग लावून जात आहे.
– दीपक ढवळे, फायरमॅन, चिखली.