नगरसेवक विकास डोळस : भोसरी-दिघी मुख्य रस्त्याचे काम मार्गी
पिंपरी – दिघीतील सुमारे 50 हजार नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या भोसरी-दिघी मुख्य रस्त्याचे काम आमदार महेश लांडगे यांच्यामुळे मार्गी लागले. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला “ग्रीन सिग्नल’ मिळाला, असे प्रतिपादन नगरसेवक विकास डोळस यांनी येथे केले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी दिघी गावठाण येथे झालेल्या बैठकीत नगरसेवक डोळस बोलत होते.
यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका हिराबाई घुले, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, माजी नगरसेविका डॉ. मीना पाटील, आशा सुपे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ मुऱ्हे, अशोक काशिद, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप परांडे, दत्ता परांडे, संजय गायकवाड, निर्मला गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोळस म्हणाले की, जागा मालक आणि प्रशासनाच्या वादात भोसरी मतदारसंघातील काही रस्त्यांची कामे रखडली होती.
ही कामे मार्गी लावण्याचा सपाटा आमदार लांडगे यांनी लावला आहे. यापूर्वीच भोसरी-दिघी शीव रस्ता (सत्संग भवन मार्ग) येथील रस्त्याचे काम 24 तासात पूर्ण करण्यात आले. त्यावेळी लांडगे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर सर्जिकल स्ट्राईक’ असे ब्रॅंडिंग’ केले होते. त्यामुळे दिघीतील रस्त्याचे काम मार्गी लावल्यानंतर “सर्जिकल स्ट्राईक’ अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत.
महापालिकेत समावेश झाल्यापासून दिघी गावातील भारतमातानगर ते आळंदी रोडचे काम प्रलंबित होते. गेल्या अनेक वर्षांत तत्कालीन राज्यकर्त्यांनी अनेकदा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. मात्र, जागा मालक आणि प्रशासन यामध्ये समझोता होऊ शकला नाही. परिणामी, भारतमातानगर, आदर्शनगर, कृष्णानगर, गणेशनगर आदी भागातील सुमारे 50 हजार नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम प्रलंबित होते.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी जागामालक धोंडिबा रामभाऊ वाळके, पांडुरंग बाबुराव वाळके आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. अवघ्या एका दिवसात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली. जागा हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करुनच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत केवळ आश्वासने मिळालेल्या रस्ता प्रत्यक्षात येत असल्याचे समाधान स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे डोळस म्हणाले.
लांडगे यांना महाराष्ट्र मजूर पक्षाचा पाठिंबा –
भोसरी विधानसभा मतदार संघातील कामगार, मजूर, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम आग्रही भूमिका घेतली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडविण्याची त्यांना तळमळ आहे. पुढील काळात याच आग्रही भूमिकेने लढण्यासाठी तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी महाराष्ट्र मजूर पक्षाने महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्र मजूर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे यांनी सांगितले.
भोसरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी महाराष्ट्र मजूर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय नेते भाऊसाहेब आडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी चव्हाण, पुणे जिल्हा समन्वयक किशोर लोखंडे, हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील शेंडगे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लालचंद आडागळे आदी उपस्थित होते.