बारावीच्या विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी

परीक्षा काळात उन्हाच्या चटक्‍यापासून खबरदारी घेण्याचे आवाहन

पुणे – बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांची “डोकी तापलेली’ आहेत. त्यातच शहरात उन्हाचा चटका वाढल्यामुळे परीक्षा काळात डोकी अधिक तापू नये, अशक्‍तपणा येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. परीक्षेला जाताना डोक्‍यावर टोपी, तोंडाला रूमाल बांधून बाहेर पडावे. बाहेरील पदार्थ खाणे टाळा आणि विशेषत: थंड पेय पिताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून करण्यात आले आहे.

बारावीच्या परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 आहे. यावेळी सूर्यनारायण आपल्या डोक्‍यावर असतात. त्यामुळे शहरात उन्हाचा चांगलाच चटका बसतो. त्यामुळे परीक्षा काळात स्वत:चे आरोग्य ठणठणित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडताना डोक्‍यावर टोपी किंवा हेल्मेट, तोंडाला स्कार्प आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल घालावा. स्वत:जवळ पाण्याची बाटली असावी, लिंबू-पाणी असेल तर चांगलेच. उन्हामध्ये जास्तवेळ थांबू नये. दुपारी 2 वाजता उन्हाचा चटका अधिक जाणवत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. पेपर संपल्यावर अनेकवेळा विद्यार्थी बाहेरील थंड पेय किंवा खाद्य पदार्थ खात असतात; परंतु थंड पेयामधील दूषित पाणी किंवा बर्फामुळे पोटदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, जुलाब यांसारखे आजार होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थंड पेय पिण्याचे टाळावे.

उन्हाच्या चटक्‍यापासून सावधान!
– बाहेरील थंड पेय किंवा पाणी पिऊ नये.
– उन्हात जाताना स्वत:जवळ पाण्याची बाटली असावी.
– डोक्‍यात टोपी, तोंडाला रूमाल आणि संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालावे.
– दर 4 तासांनी लिंबू पाणी किंवा ग्लुकोज पाणी प्यावे.
– सर्दी, खोकला किंवा पोटदुखीचा त्रास झाल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×