राज्य शिक्षण मंडळाने दिली माहिती : 14 लाख 91 हजार विद्यार्थ्यांनी केली होती परीक्षेसाठी नोंदणी
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. 28 मे) मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
मागील वर्षी 30 मे रोजी लागला होता. यंदा दोन दिवस आधीच निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता संकेतस्थळावर निकालाची प्रिंट आऊट घेता येईल. बारावी निकालासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. त्यात उद्या (दि.28) निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्चदरम्यान घेण्यात आली होती. यावर्षी राज्यभरातून एकूण 14 लाख 91 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. नऊ विभागीय मंडळामार्फत बारावीची परीक्षा झाली. दरम्यान, ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणीसाठी 29 मे ते 7 जून आणि छायाप्रतीसाठी दि. 29 मे ते 17 जूनर्यंत शुल्क भरून अर्ज करता येईल.
या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.maharashtra12.jagranjosh.com
“एसएमएस’द्वारे निकाल
बीएसएनएल नेटवर्कवरून MHHSC हा कोड व बैठक क्रमांक टाकून 57766 या क्रमांकावर पाठवूनही विद्यार्थ्यांना निकाल जाणून घेता येणार आहे.
पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये
बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन परीक्षांमध्ये म्हणजेच जुलै-ऑगस्ट 2019 व फेब्रुवारी-मार्च 2020 अशा दोनच संधी श्रेणी-गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.