HSC Result 2026 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला असून, आता विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी १७ मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार असून, यासाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर सर्व माहिती, अटी, शर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठी शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरावयाचे आहे. गुण पडताळणीसाठी १७ मेपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या तीन परीक्षांमध्ये परीक्षेस पुनश्च प्रविष्ट होता येईल. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७ च्या परीक्षेस श्रेणीसुधार, गुणसुधारसाठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी ई-मेलद्वारे, संकेतस्थळावरून, हस्तपोहोच, रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीने छायाप्रती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील.