HSC Exam2024 । 12th Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता आला. यावर्षी राज्यात १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली, ज्याचा आज निकाल लागला आहे.
विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. तर, कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय.
यंदाच्या निकालाची ठळक वैशिष्टये :-
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय.
या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५,४४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५,०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२,४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.
३. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१,३६२ एवढी असून त्यापैकी ४०,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.
५. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५ %) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९५.४४ % असून मुलांचा निकाल ९१.६० % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ % ने जास्त आहे
दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा :-
दरम्यान, आज (दि. २१) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. मे महिन्याच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.