मुंबई – बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षा काळातच हा प्रकार घडल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
या शिक्षकाने केमिस्ट्रीचा पेपर आपल्या कोचिंग क्लासेसच्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला होतो. शनिवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास केमिस्ट्रीचा पेपर सुरु होणार होता. मात्र, परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्याने एकच गोंधळ झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तसेच कोचिंग क्लासेसचे शिक्षक मुकेश यादव सोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का? याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी ती विद्यार्थ्यांची चौकशीदेखील केली असून, पुढील तपास सुरु आहे. मात्र, केमिस्ट्रीचा हा फुटलेला पेपर आणखी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला, याचीही माहिती घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.