HSC Exam Hall Ticket : 11 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. फेब्रुवारी – मार्च 2025 साठी आयोजित उच्च माध्यमिक परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच, प्रवेशपत्रे डाउनलोड करताना कोणतीही समस्या आल्यास संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
कुठून डाउनलोड करता येतील प्रवेशपत्रं?
12वी ची प्रवेशपत्र शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वरून डाउनलोड करता येईल. वेबसाइटवरील अॅडमिट कार्ड या लिंकवरुन डाउनलोड करता येणार आहेत. माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनीच विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्र डाउनलोड व प्रिंट करून उपलब्ध करून देतील. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या शिक्क्यासह स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना दिले जाईल.
तसेच, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात काही चुका असल्यास अथवा त्यात बदल करायचा असल्यास संबंधित महाविद्यालयाने विभागीय मंडळाशी याबाबत संपर्क साधावा लागेल. दरम्यान, बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडणार आहे.