बॉलिवुड आणि क्रिकेट यांच्यात खुपच अनोखा संगम राहिलेला आहे. इंडस्ट्रीत सुरू असलेल्या बायॉपिकच्या ट्रेंडमध्ये मग क्रिकेट कसे मागे राहणार. यामुळेच आगामी काळात रणवीर सिंह हा कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सुशांत सिंह राजपूत याचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याच्या जीवनावर आधारित चित्रपट यापूर्वीच प्रदर्शित झालेला आहे. आता भारतीय क्रीकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या बायॉपिकची जोरदार चर्चा आहे.
भारतीय क्रीकेट संघाच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट क्रिकेटर्स पैकी एक असलेल्या सौरभ गांगुली उर्फ “दादा’ याने अनेक विक्रम स्थापित केलेले आहेत. देशातील लाखो चाहते हे त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीचे दीवाने आहेत. तो जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा तो भारतीय संघाला निश्चित विजय मिळवून देईल, अशी चाहत्यांना आशा असायची. दरम्यान, एका टॉक शोमध्ये त्याला विचारण्यात आले होते की, तुझ्या बायॉपिकमध्ये तुझ्या भूमिकेत बघायला कोण आवडेल? यावर तो म्हणाला, रितिक रोशन! जो मला खूपच आवडतो.
दरम्यान, रितिक रोशन त्या एक कलाकारांपैकी आहे, जो वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. याच वर्षी रितिकने दोन वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांना सरप्राइज दिले होते. एकीकडे त्याने “सुपर 30’मध्ये एका साधारण डी-ग्लॅम बिहारीची दमदार भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे “वॉर’मध्ये त्याने आपल्या स्टाइल आणि ऍक्शनने सर्वांची मने जिंकली. आता तो फराह खानच्या “सत्ते पे सत्ता’च्या रीमेकमध्ये अनुष्का शर्मासोबत झळकणार आहे. याशिवाय “क्रिश-4’मध्येही झळकणार आहे.