बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. कंगनाने गतवर्षी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृतिक रोशनवर हल्लाबोल करताना त्याच्यावर थेट फसवणुकीचा आरोप लावला होता. त्यावेळी थेट प्रसिद्धी माध्यमांसमोर कंगनाने हृतिकवर आरोप लावल्याने बॉलिवूडमध्ये मोठे वादंग देखील उठले होते.
दरम्यान, आता हृतिकचा “सुपर 3.0′ आणि कंगणा रणावतचा ‘मेंटल है क्या’ हे एकाच मुहुर्तावर रिलीज होणार असल्याचे चित्र निर्माण झाल्याने कंगणा आणि हृतिक यांच्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच पाहायला मिळणार अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र कंगणाच्या नादाला लागायला नको, म्हणून हृतिकने आपल्या सिनेमाचे रिलीज पुढे ढकलले आहे. “मेंटल है क्या…’ची निर्माती एकता कपूरने आपला सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे हृतिक अडचणीत आला होता.
मात्र हृतिकला अडचणीत आणण्यासाठी नव्हे, तर मार्केटिंग सर्व्हेच्या रिपोर्टनुसार आपला सिनेमा पुढे ढकलल्याचे एकताने स्पष्ट केले होते. मात्र लगेच दुसऱ्याच दिवशी हृतिकने आपला सिनेमा पुढे ढकलणार असल्याचे सांगितले होते. आपल्या सिनेमाबाबत माध्यमांमधून विनाकारण सर्कस करायची नाही. विनाकारण डोक्याला ताप करून घ्यायचा नाही आणि बौद्धिक हिंसेपासून स्वतःला वाचवण्यासाठीच “सुपर 3.0′ पुढे ढकलत आहे, असे हृतिकने म्हटले आहे.
सिनेमा तयार असूनही त्याने आपल्या निर्मात्यांना रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती केल्याचेही म्हटले आहे. हृतिकने “सुपर 3.0′ ची बदललेली रिलीज डेट काय असेल हे सांगितलेले नाही. पण ही नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे मात्र स्पष्ट केले आहे.