पुणे –पुनित बालन ग्रुप आयोजित पाचव्या पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत कर्णधार पूनम खेमनार हिच्या कामगिरीच्या जोरावर एचपी सुपरनोव्हाज संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्या विरुद्ध सलग दोन विजयाची नोंद केली. दोन्ही सामन्यात सामन्याची मानकरी पूनम खेमनार ठरली.
मुंढवा येथील लिजंडस स्पोर्टस क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पूनम खेमनार हिने केलेल्या 85 धावांच्या खेळीच्या जोरावर एचपी सुपरनोव्हाज संघाने कुंतिविमलजी सुपरस्टार्स संघाचा 52 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एचपी सुपरनोव्हाजने 20 षटकात 4 गडी गमावून 148 धावा केल्या. यामध्ये पूनम खेमनार हिने 65 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावा फटकावल्या. तिला प्रियांका घोडके 22 व सुशमा पाटील 17 यांनी साथ दिली. चौथ्या गड्यासाठी पूनम आणि प्रियांका यांनी 37 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरामध्ये कुंतिविमलजी सुपरस्टार्स संघाला 20 षटकात 7 गडी गमावून 96 धावा जमविता आल्या. साक्षी वाघमोडे हिने 48 धावांची
खेळी केली.
ऋतुराजचे बहुमोल मार्गदर्शन
महाराष्ट्राचा रणजीपटू आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड याने स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने महिला खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेचा तसेच चैन्नई सुपर किंग्ज् या आपल्या आयपीएल संघातील त्याने अनुभव खेळाडूंना सांगितले.
दुसऱ्या सामन्यात एचपी सुपरनोव्हाज संघाने निंबाळकर रॉयल्स संघावर केवळ 3 धावांनी निसटता विजय मिळवून स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. एचपी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 114 धावा केल्या. माधुरी आगव 25, सुशमा पाटील 14, पूनम खेमनार 14, प्रियांका घोडके 15 आणि मानसी तिवारी 14 यांनी महत्त्वपूर्ण धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.
निंबाळकर रॉयल्स संघाच्या तेजल हसबनीस हिने 46 चेंडूत 9 चौकारांसह 55 धावा करून संघाला विजयाच्या समीप नेले. परंतु महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि विजय अवघड होत गेला. निंबाळकर संघाचा डाव 19.3 षटकात 111 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार पूनम खेमनार 24 धावात 3 गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच प्रियांका घोडके (2-14) हिनेही टिच्चून गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक –
1) एचपी सुपरनोव्हाज – 20 षटकात 4 बाद 148 धावा (पूनम खेमनार 85, प्रियांका घोडके नाबाद 22, सुशमा पाटील 17, उत्कर्षा पवार 1-26). वि. वि. कुंतिविमलजी सुपरस्टार्स – 20 षटकात 7 बाद 96 धावा (साक्षी वाघमोडे नाबाद 48, उत्कर्षा देशपांडे 10, आरती बेहनवाल 2-9). सामन्याची मानकरी – पूनम खेमनार (एचपी सुपरनोव्हाज).
2) एचपी सुपरनोव्हाज – 20 षटकात 8 बाद 114 धावा (माधुरी आगव 25, सुशमा पाटील 14, पूनम खेमनार 14, प्रियांका घोडके 15, मानसी तिवारी 14, प्रज्ञा वीरकर 2-15, सोनल पाटील 2-14) वि. वि. निंबाळकर रॉयल्स – 19.3 षटकात सर्वबाद 111 धावा (तेजल हसबनीस 55, सोनल पाटील 15, प्रज्ञा वीरकर 14, पूनम खेमनार 3-24, प्रियांका घोडके 2-14). सामन्याची मानकरी – पूनम खेमनार (एचपी सुपरनोव्हाज).