ब्राझीलिया : एखाद्या महिलेने जुळ्या मुलांना जन्म देणे जरी दुर्मिळ गोष्ट नसली तरी या जुळ्या मुलांचे पिता वेगळे असल्याची घटना मात्र दुर्मिळ मानण्यात येते. ब्राझीलमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. महिलेने आपल्या जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर आठ महिन्यानी जी डीएनए टेस्ट करण्यात आली त्यामध्ये या दोन्ही मुलांचे वडील वेगवेगळे असल्याचे लक्षात आले.
अशी घटना दुर्मिळ मानण्यात येते कारण जगात आत्तापर्यंत अशा फक्त वीस घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये जन्माला आलेल्या जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळे आहेत. ब्राझीलमधील मीरोज नावाच्या शहरातील ही घटना असून एका 19 वर्षीय मुलीबाबत ही घटना घडली आहे.
या मुलीने दिलेल्या माहितीप्रमाणे, एकाच दिवशी दोन विविध पुरुषांशी संबंध ठेवल्यामुळे असे झाले असू शकते पण तिच्या पोटात जेव्हा जुळी मुले वाढत होती तेव्हा त्यांचे पिता वेगवेगळे आहेत याची कोणतीही कल्पना तिला नव्हती. मुलांना जन्म दिल्यानंतर तिने मुलांची ओळख निश्चित करण्यासाठी जोडीदाराची डीएनए टेस्ट केली, तेव्हा जुळ्या मुलांपैकी एकाशीच त्याचा डीएनए मॅच झाला त्यामुळे ती हैराण झाली.
त्यानंतर तिने दुसऱ्या पुरुषाचीही डीएनए टेस्ट केली. ती टेस्ट मॅच दुसऱ्या मुलाबरोबर मॅच झाली. वैद्यकीय परिभाषेत याला हेटरोपेरेंटल सुपरफेकुंडेशन असे म्हंटले जाते महिलेने एकाच वेळी एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध ठेवला आणि त्यांच्यापासून तिला गर्भधारणा झाली तर असा प्रकार होऊ शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे