पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे पडले होते. त्यानंतर महापालिकेच्या पथ विभागावर मोठया प्रमाणात टिका झाल्याने पथ विभागाने शहरातील रस्त्यांवर होत असलेल्या खोदाईवर या खराब रस्त्यांचे खापर फोडत या खोदाईची दुरूस्तीच्या निविदा काढल्या असून या निविदा चक्क २५ ते ४० टक्के कमी दराने आलेल्या आहेत.
विशेष म्हणजे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी या निविदा काढलेल्या असून सर्वच निविदा या कमी दराने आलेल्या आहेत. त्यामुळे ही दुरूस्ती नावालाच केली जाणार असल्याची चर्चा आहे.
तसेच, जर ही कामे ४० टक्के कमी दराने होत असतील तर कामांची गुणवत्ता राहणार का आणि रस्ते पुन्हा उखडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरवर्षीच खोदाई…
शहरात गेल्या काही वर्षात खासगी मोबाईल कंपन्यांकडून मोठया प्रमाणात केबल टाकण्यात येत आहेत. तसेच, महावितरण, एमएनजीएल, बीएसएनएल या शासकीय कंपन्यांसह महापालिकेचा ड्रेणेज विभाग व समान पाणी पुरवठा, प्रकल्प विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडूनही तातडीच्या कामाच्या नावाखाली रस्ते खोदाई केली जाते. हे खोदलेले रस्ते संबधीतांनीच दुरूस्त करणे बंधनकारक होते.
मात्र, त्यांच्याकडून कामाची गुणवत्ता राहत नसल्याने हे काम पथ विभागाकडे देण्यात आले त्यासाठी पथ विभागाकडून प्रती रनिंग मीटर १२ हजार रूपयांचे खोदाई शुल्क आकारले जाते. नंतर या निधीतून रस्ते दुरूस्त केले जातात. दरवर्षी शहरात अशा प्रकारे जवळपास ३०० ते ४०० किलोमीटरची खोदाई केली जाते. त्यानंतर महापालिका या रस्त्यांची दुरूस्ती करत असल्याचा दावा केला जातो.
कामाची गुणवत्ता कशी राहणार…
महापालिकेच्या कोणत्याही कामांसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर ( डीएसआर) राज्यशासनाकडून निश्चित करून दिले जातात. त्यानुसार, महापालिका विकासकामांसाठी लागणारे साहित्य तसेच इतर आवश्यक खर्चाचा विचार करून पूर्वगणकपत्र तयार करून निविदा काढते.
कामांची गुणवत्ता लक्षात घेऊन हे दर निश्चित केलेले असतात. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेने काढलेल्या निविदांच्या दरांपेक्षा ३० ते ४० टक्के कमी दराने निविदा आल्याने महापालिकेस अपेक्षीत असलेले साहित्य वापरले जाते की नाही तसेच कामाची गुणवत्ता राहते का हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, महापालिका पैसे वाचत असल्याचे सांगत निविदा काढून बाजूला होते.
महापालिकेकडून पूर्वगणकपत्र तयार करून निविदा काढल्या जातात. मात्र, निविदा कमी दराने येत असल्या तरी पथ विभागाकडून या कामांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
खोदलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीच्या कामात कोणतीही कसर केली जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास संबधितांवर कारवाई केली जाईल. – अनिरूद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख