ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करणार तरी कसे? केंद्राकडून सूचनाच नाही

दि. 1 मार्चपासून मोहीम, पण केंद्राकडून सूचनाच नसल्याने आरोग्य विभागाला प्रश्‍न

पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा दि. 1 मार्चपासून म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले खरे, परंतु त्यांची नोंदणी, कुठे, कधी आणि कशी करायची? ती करायची की नाही? तसेच विविध आजारपण असलेल्या 45 वयाच्या वरच्या व्यक्तींनी नोंदणी करताना आजारपणाचे कोणते पुरावे द्यायचे, वगैरे सूचनाच केंद्राकडून आल्या नाहीत. त्यामुळे तीनच दिवसानंतर होणाऱ्या या लसीकरणाच्या व्यापक टप्प्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

45 वर्षांवरील आजारी व्यक्ती आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या लसीकरणाला दि. 1 मार्चपासून देशभरात सुरूवात करण्यात येणार आहे. हे लसीकरण मोफत असणार आहे.

हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्स या दोहोंची नोंदणी आधी “कोविन ऍप’वर करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यांची संख्याही तशी मर्यादित आणि सरकारी कार्यालये, रुग्णालये यांच्यापुरतेच मर्यादित होते. परंतु आता वरील आदेशाने लसीकरण मोहिमेला व्यापक स्वरूप येऊ घातले आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु अगदी तळागाळापर्यंत हे लसीकरण होणार असले तरी त्या वृद्धांची नोंदणी कुठे, कशी करायची? की करायचीच नाही या संदर्भात केंद्राकडून राज्यांना अद्यापही कोणतेच नियोजन आले नाही.

त्यामुळे ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत पुढे नक्की काय करायचे हे अद्यापही त्यांना उमगत नाही. वास्तविक आरोग्य विभागाची लसीकरण करण्याची म्हणजे टोचक, लस, मनुष्यबळ यांची तयारी आहे. परंतु समोर ज्यांना लस द्यायची त्याच्या डिटेल्सविषयी आणि त्यांच्या नोंदणीविषयी, त्यांना कॉन्टॅक्‍ट करण्याविषयी काही सुस्पष्टता नसल्याने ही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

अनेक अडचणी…
जे जेष्ठ नागरिक केंद्रांपर्यंत येऊ शकतील, काही तास उभे राहू शकतील, त्यांचे ठीक आहे, परंतु ज्यांना केंद्रापर्यंत जाणे शक्‍य नाही, किंवा अंथरूणाला खिळून आहेत, किंवा घराबाहेर पडू शकत नाहीत, चालू शकत नाहीत अशा वृद्धांच्या लसीकरणाचे काय याविषयीही केंद्राचे काही निर्देश नाहीत.

लस टोचक, लसीची उपलब्धता, अन्य मनुष्यबळ, लसीकरण केंद्र या सगळ्या उपलब्धता आमच्याकडे आहेत. परंतु अद्याप “सिनियर सिटिझन्स’ची नोंदणी कशी करायची वगैरे सूचना केंद्राकडून आम्हांला आल्या नाहीत. परंतु लसीकरणाची संपूर्ण तयारी आमची पूर्ण आहे.
– डॉ. अर्चना पाटील, आरोग्य प्रमुख, महाराष्ट्र

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.