मुंबई – मुंबई पोलीस आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे पगार आता एचडीएफसी बॅंकेतून होणार आहेत. यापूर्वी मुंबई पोलिसांना एक्सिस बॅंकेतून पगार मिळत होता, पण आता एचडीएफसी बॅंकेतून पगार मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु झाले आहे.
राज्य सरकारी कर्मचार्यांच्या पगाराची खाती मनमानी करुन ज्या पद्धतीने बँकेची निवड करत रातोरात हलवण्यात आली होती, हे लक्षात घेता हा निर्णय आवश्यकच होता, असे ट्विट प्रियांका चतुर्वेदी यांनी केले होते. यावर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत प्रियांका चतुर्वेदींना प्रत्युत्तर दिले आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या कि, अॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही, ही खाजगी क्षेत्रातील तिसर्या क्रमांकाची मोठी बँक आहे. मी त्यातील एक कर्मचारी असून त्याच बँकेसाठी १८ वर्ष काम केले आहे. संधीसाधू आणि दलबदलूंना हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे समजतील?, अशी जोरदार टीकाही त्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर केली आहे.
Axis Bank is not my family Bank-it’s third largest listed private sector bank and I’m an employee who has worked for the same bank for 18 years! How will an opportunistic दल बदलू understand this honesty & hard work! These accounts were acquired in 2005-basis technology & services https://t.co/bFDnvjiaEa
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 23, 2020
तसेच, ही खाती २००५ आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार प्राप्त झाली होती, असेही अमृता यांनी सांगितले.
दरम्यान, एक्सिस बॅंकेचा एमओयू 31 जुलैला संपल्यानंतर नवीन बॅंकेचे प्रस्ताव आले होते. यामध्ये एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात अधिक सुविधा मिळत असल्याने या बॅंकेची निवड करण्यात आली आहे.
एचडीएफसी बॅंकेकडून मुंबई पोलिसांना उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना एचडीएफसी बॅंक देणार आहे.