मोबाइलपासून मुलांना दूर कसं ठेवाल?

सध्या घरोघरी एका नव्या डोकेदुखीने पालकांची झोप उडवली आहे. ती आहे, मुलांना लागलेली मोबाइलची चटक. अर्थात मोठ्यांवरही याचे गारूड आहेच, पण त्याने फारसा फरक पडेल असं नाही. मुलांना वेळीच आवरले नाही, तर मात्र अनर्थ ओढवू शकतो. कसं आवराल त्यांना…?

ज्यांच्या घरी मुलं आहेत, त्यांना रोज नव्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. तंत्रज्ञान वाढलं, तसं त्याचा उपयोग आणि दुरूपयोगही. मोबाइलचंही तसंच. तो आपल्याला जितका फायद्याचा ठरला, तितकाच त्याचा त्रासही होऊ लागलाय. काही मंडळींना त्याची इतकी चटक लागलीय की जेवतानाही अनेक जण त्याच्याशिवाय बसतच नाहीत. पण मोठ्या माणसांचं त्यानं फारसं काही बिघडेल असं नाही किंवा बिघडलं, तरी ते नियंत्रणात आणण्याची त्यांची क्षमता असते. पण मुलांचं काय? त्यांच्यावर विपरित परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यांना त्यापासून कसं दूर करता येईल? त्यासाठी या काही टिप्स…

मोबाइल का आवडतो, ते जाणून घ्या…
मोबाइल त्यांना का आवडतो, ते आधी जाणून घ्या. त्यांची कारणं समजून घ्या. त्यात किती तथ्य आहे, त्याचा अंदाज घ्या. त्याला त्याची समज आलीय का, याचीही पडताळणी करा.

बाहेरच्या खेळांची आवड निर्माण करा
मोबाइलबाबत मुलांनी कितीही समर्थन केलं, तरीही त्यांना त्याचा फोलपणा पटवून द्या. आरडाओरडा करून काहीही होत नाही. त्यांच्याशी प्रेमाने बोला आणि मोबाइलपेक्षाही बाहेरच्या खेळाची आवड त्यांच्यात निर्माण करा. त्यांना तुम्ही आग्रहाने बाहेर खेळायला पाठवा, त्यात गोडी निर्माण झाली की आपोआप मोबाइलपासून ती दूर जातील.

वेळापत्रक ठरवा
मोबाइलवर गेम खेळायलाही हरकत नाहीच, पण त्याआधी त्याचं एक वेळापत्रक ठरवा. त्याच वेळी त्यांनी मोबाइल हातात घ्यावा, नाहीतर मिळणार नाही. हे बजावून सांगा. त्या वेळी तुम्ही त्यांच्यासमोर राहाल, याची काळजी घ्या. म्हणजे त्यांच्यावर एक नैतिक दडपण येईल. महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या हातात मोबाइल देताना प्रथम त्यावरील इंटरनेट कनेक्‍शन, मोबाइल डाटा बंद करा.

घरातलेच पर्यायी खेळ सूचवा
मुलांनी हातात मोबाइल घेतला की लगेच त्यांना घरातल्याच काही खेळांची आठवण करून द्या. ज्यात त्यांना विशेष आवड असेल, असे कॅरम, बुद्धिबळसारखे बैठे खेळही त्यांना शिकवा. त्यातली गंमत त्यांना अनुभवू द्या. एकदा का त्याची गोडी त्यांना लागली की मग ते फार काळ मोबाइलला चिकटून राहणार नाहीत.

छंदांचीही गोडी लावा
चित्रकला, रंगकाम, ओरिगामी, झाडांची देखभाल… यासारख्या काही छंदांची गोडी त्यांना लावा. एकदा का मुलांना छंदांची गोडी लागली की मग तीे मोबाइलच्या नादी फारशी लागणार नाहीत. त्यांना आवड लागलेल्या छंदांमध्ये कोणतेही असू द्यात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींतही ते आनंद शोधत असतात. अशा वेळी त्यांना नावे ठेवण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या.

– प्रा. शुभांगी कुलकर्णी 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)