मधुमेहाचे धोके कसे कमी कराल?

मधुमेह आणि हृदयरोग हे आपल्या लोकांमध्ये आढळून येणारे काही सामान्य रोग आहेत. रक्‍तातील साखरेची किंवा कोलेस्टेरॉलची उच्च पातळी यांच्यामुळे आरोग्याची इतरही गुंतागुंत होते. मेथीचे दाणे या दोन्ही समस्यांवर उपयुक्‍त आहेत.

मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांनी मेथीचे दाणे सेवन केल्यास नेहमीच्या नेमून दिलेल्या औषधांच्या उपचाराला जोड मिळते. मेथीचे दाणे किती प्रमाणात खावेत, ते खाण्याची पध्दत याविषयी…
भारतीयांच्या स्वयंपाकामध्ये एक मसाला म्हणून नित्य नियमाने मेथीचा वापर केला जातो. मेथीचे दाणे सर्वत्र सहजपणे उपलब्ध असतात.

या दाण्यांमध्ये चोथ्याचं प्रमाण अधिक असल्यानं (50 टक्के), ते मधुमेहावरील उपचारात, रक्‍त आणि लघवीतील साखर आणि उच्च सीरम कोलेस्टेरॉल असणाऱ्या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात उपयुक्‍त ठरतात. मेथीच्या कच्च्या व शिजवलेल्या दाण्यांमधे हे सर्व गुणधर्म असतात.
मेथीची पानं (हिरवी पालेभाजी) असा कोणताही प्रभाव दाखवू शकत नाहीत.
मेथीचे दाणे खाण्याचं प्रमाण हे मधुमेहाची तीव्रता आणि सीरम कोलेस्टेरॉलची पातळी यांच्यावर अवलंबून असतं. त्याचा डोस 25 ग्रॅम ते 50 ग्रॅम इतका असू शकतो.

सुरुवातीला 25 ग्रॅम मेथीचे दाणे प्रत्येकी 12.5 ग्रॅमच्या दोन समान डोसमधे (अंदाजे दोन चहाचे चमचे) दोन मुख्य जेवणं, दुपारचं आणि रात्रीचं, यांच्यासोबत घ्यावेत.
हे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर तसेच खावेत किंवा ते कुटून पाण्यात किंवा ताकात मिसळून, जेवणापूर्वी 15 मिनिटे खावेत.
या दाण्यांची कडू चव कमी करण्यासाठी ठराविक प्रक्रिया करावी लागते. कडवटपणा काढलेले मेथीचे दाणे बाजारात उपलब्ध नाहीत.

दाण्यांचा लगदा (रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर) पोळ्या, दही, डोसा, इडली, पोंगल, उपमा, दलिया, ढोकळा, डाळ, भाज्यांच्या आमटीत वापरता येतो.
रक्‍तातील आणि लघवीतील साखरेची उच्च पातळी आहे, तोवर मेथीचे दाणे घ्यावेत.
मेथीच्या दाण्यांच्या उपचारासोबतच चालणे यासारखा व्यायाम नियमित करण्यानं देखील फायदा होतो. शरीराचं वजन कमी करण्यानं देखील इन्शुलीनचं कार्य सुधारतं. संपृक्‍त चरबी आणि साधी साखरेपासून मिळणारे आहारातील उष्मांक कमी होतात.

काही रुग्णांना मेथीचे दाणे सेवन केल्यानंतर अतिसार किंवा अति प्रमाणात वायू सरण्याचा त्रास होऊ शकतो.
मेथीचे दाणे हे केवळ आहाराला पूरक असा उपचार आहे आणि नेहमीचे मधुमेह-विरोधी उपचार चालूच ठेवायचे आहेत. तथापि, मेथीदाण्यांचा वापर करण्यानं मधुमेह-विरोधी औषधांचा वापर कमी करता येतो. मधुमेह-विरोधी औषधांची वैयक्‍तिक कमाल मात्रा यासंबंधी सल्ला देता येणार नाही. आपल्या स्थितीच्या अनुसार केवळ आपले डॉक्‍टरच योग्य ते औषध आणि त्याचा डोस ठरवू शकतात. मधुमेहाची तीव्र गुंतागुंत झाल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.