भोपाळ : मध्य प्रदेशमधील हनी ट्रॅपमध्ये 24 हून अधिक युवतींना ढकलल्याची खळबळजनक कबुली याची सुत्रधार श्वेता जैनने दिली. या गरीब युवतींना ते कशाप्रकारे जाळ्यात ओढायचे याचा विशेष पोलिस पथकाने केलेला धक्कादायक खुलासा.
मोनिका यादव ही तरूणी प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या निमित्ताने हनीट्रॅपची सुत्रधार श्वेता जैनच्या संपर्कात आली. श्वेताने तिला आपली मध्य प्रदेश सरकारमध्ये वट असल्याचे सांगितले. विश्वास कमावण्यासाठी तिने तिला एकदा सचिवालयात इंदूरहून घेऊन गेली. त्यावेळी तिने तीन सचीव दर्जाच्या आयएएस अधिकाऱ्यांची ओळख करून दिली होती. इंदूर भोपाळ जाण्या येण्यासाठी तिला ऑडी मोटारीची व्यवस्था केली होती.
सुरवातीला मोनिकाने श्वेताला नकार दिला होता. ती नरसिंगगढ येथील आपल्या वडिलांच्या घरी परतली होती. त्याचवेळी तिला आरती दयाल भेटली. तिने मोनिकाच्या वडिलांना सांगितले की तुम्ही तुमच्या मुलीला भोपाळला पाठवल्यास आमची स्वयंसेवी संघटना तिच्या शिक्षणाचा खर्च करेल. त्यानंतर मोनिकाच्या वडिलांनी तिला भोपाळ शिक्षणासाठी पाठवले. एक दिवस आरतीने मोनिकाला श्वेता एका अधिकाऱ्यासोबत शय्यासोबत करत असल्याचा एमएमएस दाखवला. आरती मोनिकाला म्हणाली, मोठं व्हायचं असलं तर हे करावंच लागतं. स्वयंसेवी संस्था आणि नोकरीच्या निमित्ताने कनिष्ठ मध्यम वर्गीय मुलींना शोधून त्यांचे ब्रेन वॉश करून त्यांना हनीट्रॅप रॅकेटसाठी पाठवले जायचे.
मोनिकाने दिलेल्या जबाबानुसार, आरती, तिची सहकारी रुपा यांनी तिला 30 ऑगस्टला भोपाळहून आरामदायी मोटारीने इंदूरला घेऊन आल्या. तेथे त्या एका अलिशान हॉटेलमध्ये राहिल्या. दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांनी तिची ओळख सरकारी अभियंता हरभजनसिंग (वय 60) यांच्याशी करून दिली. पूर्ण रात्र ती हरभजनबरोबर होती. त्यात हरभजनने तिच्याशी शरीर संबंध ठेवले. आरतीने त्या दोघातील शरीर संबंधाचे व्हिडिओ चित्रण केले.
या व्हिडिओ क्लिपच्या आधारे हरभजनकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली. याची माहिती कोणालाही दिल्यास हि व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी मोनिकाला दिली. इंदूरच्या पहिल्या महिला वरिष्ठ पोलिस अधिक्षक रुची वर्धमानसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखासीन आयुष्याचे स्वप्न दाखवून श्वेता आणि आरती या युवतींना या स्कॅंडलमध्ये ओढायच्या. या तरूणींना पहिल्यांदा पंचतारांकित संस्कृती दाकवली जायाची. त्याचे स्वप्न दाखविले जायचे. त्यानंतर या अधिकारी राजकारण्यांना हनी ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी भरपूर पैसेही द्यायचे. याशिवाय 40 कॉलगर्लचाही यासाठी वापर केला जात असे.