नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने पॅनकार्डचा अनिवार्य कागदपत्रांमध्ये समावेश केलेला आहे. पॅन कार्डशिवाय बँकेत खाते उघडले जावू शकत नाही तसेच आयकर विवरणपत्रही भरता येत नाही.
जर तुम्ही पॅनकार्ड बनवले नसेल तर उशीर न करता अगदी सोप्या पद्धतीने आणि तेही मोफत पॅनकार्ड तयार करू शकता. यापूर्वी पॅनकार्ड बनविण्यासाठी मोठी प्रक्रिया होती मात्र आता, काही मिनिटांमध्येच पॅनकार्ड तुमच्या हातात मिळेल.
प्राप्तिकर विभागाच्या सुविधेनुसार आधार कार्डच्या माध्यमातून अवघ्या 10 मिनिटात विनामूल्य ऑनलाइन पॅन कार्ड तयार होईल. इन्स्टंट ई-पॅन कार्ड अर्ज फॉर्ममध्ये तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
पॅनकार्डसाठी अप्लाय केल्यानंतर 10 मिनिटांत पीडीएफ फाॅर्म्ॅटमध्ये तुम्हाला पॅनकार्ड मिळेल.
जाणून घ्या सोपी पद्धत –
1) प्राप्तिकर विभागाकडून पॅनकार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला ई-फाईलिंग पोर्टलवर जाऊन ‘Instant PAN through Aadhaar’वर क्लिक करावे लागेल त्यानंतर ‘Get New PAN’ निवडावे लागेल. तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल. ओटीपी प्रमाणीकरणानंतर तुम्हाला ई-पॅन देण्यात येईल.
2) यात अर्जदाराला पॅनकार्डची प्रत पीडीएफ स्वरूपात मिळते, ज्यात क्यूआर कोड असतो. या क्यूआर कोडमध्ये, अर्जदाराचे डेमोग्राफिक तपशील आणि फोटो असतो. अर्ज करतांना, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर 15 अंकी क्रमांक पाठविला जातो. या नंबरच्या मदतीने ई-पॅन डाऊनलोड करता येईल. याची एक प्रत अॅप्लिकेशनच्या ईमेल आयडीवरही पाठविली जाते. मात्र, आधारसह ईमेल आयडी नोंदणी असणे अनिवार्य आहे. नुकतेच प्राप्तिकर विभागाने ई-पॅनशी संबंधित नियमात बदल करून ही सुलभ प्रक्रिया केली आहे.
3) पॅन कार्ड एनएसडीएल आणि यूटीआयटीएसएलद्वारे देखील दिले जाते. मात्र, या दोन युनिट्सकडून पॅनकार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला निश्चित शुल्क भरावे लागेल. याउलट प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर पूर्णपणे विनामूल्य पॅन कार्ड मिळते.
4) इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत तुम्हाला कोणताही तपशील भरायचा नाही. महत्वाची माहिती तुमच्या आधारवरून घेतली जाते. याव्यतिरिक्त, पॅन कार्ड आणि आधार कार्ड स्वयंचलितरित्या जोडले जातात. लिंक करण्यासाठी तुम्हाला दुसरे काही करावे लागत नाही.
5) प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे की, इन्स्टंट पॅनसाठी फक्त 10 मिनिटे लागतात. आतापर्यंत 6.7 लाख लोकांचे इन्स्टंट पॅन तयार केले गेले आहेत.