बहुतांश आघाडीची वृत्तपत्रे (मराठी, हिंदी, इंग्लिश अन्य भाषिक) आपली ई-आवृत्ती प्रसिद्ध करतातच. येथे सर्व अंकांच्या पीडीएफ फाईल्स असतात. या सर्व वृत्तपत्रांच्या वेबसाईटस शोधत बसण्यापेक्षा आपण www.epapergallery.com या वेबसाईटला भेट दिली असता तेथे सर्वच आघाडीचे वृत्तपत्रे दिसून येतात.
यामध्ये काही वृत्तपत्रांच्या ई-आवृत्तीसाठी मेंबरशिप पेमेंट करणे आवश्यक ठरते, तर काही वृत्तपत्रे प्रत्येक डिजिटल कात्रणासाठी स्वतंत्रपणे पैसे मागतात. मात्र, बहुतांश डिजिटल कात्रणे कसलेही शुल्क न भरता घेता येतात.
त्यामुळे एखादी महत्त्वाची बातमी किंवा तुमचा स्वत:चा लेख मोबाईलने फोटो न काढता, त्याची सुवाच्य डिजिटल कटींगची कॉपी तुम्ही सोशल मिडीयामध्ये लिंकसह शेअर करु शकता, ज्याचा उपयोग पॉवरपॉईंट शो, ऑनलाईन मिटींगमध्येही तुम्हाला करता येऊ शकतो.
इथे दै. प्रभातचे उदाहरण दिले आहे. मात्र थोड्याफार फरकाने हे सर्वच वृत्तपत्रांच्या इंटरनेट एडिशनला लागू पडते. बघा प्रयत्न करुन… दै. प्रभातच्या अंकातील आपल्याला हव्या त्या मजकुराचे डिजिटल कात्रण कसे काढायचे?
- सर्वप्रथम epaper.eprabhat.net ही वेबसाईट ओपन करा.
- आपल्याला हवा असलेला मजकूर कोणत्या आवृत्तीमध्ये कोणत्या पानावर आहे, ते पान ओपन करा.
- दै. प्रभातच्या वेबसाईटवर आपल्याला पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा, अहमदनगर, सातारा आणि रुपगंध असे पर्याय दिसतील.
- त्यातील योग्य पर्याय निवडा आणि तुम्हाला हवे असलेले पान ओपन करा.
-
डिजिटल कात्रण कापण्यासाठी प्रत्येक पानाच्या वरच्या बाजूला डावीकडे एक कात्रीचे चित्र दिसेल. त्यावर क्लिक करा.
-
कात्रीवर क्लिक केले असता, त्या पानावर एक पारदर्शक चौकोन निर्माण होईल आणि बाकीचे पान अंधुक दिसेल.
- हा पारदर्शक चौकोन तुम्हाला हव्या असलेल्या बातमीवर/मजकुरावर न्या आणि ती बातमी दिसेल त्या आकाराप्रमाणे ऍडजस्ट करा.
- आता तुम्हाला फक्त तुम्ही निवडलेल्या बातमीची चौकट स्पष्ट दिसेल.
- या निवडलेल्या बातमीच्या लगेचच वरती clip and share असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
-
मग एक नवीन विंडो तयार होईल, ज्यामध्ये तुमची बातमी आणि तिची लिंक दिसेल.
-
आधी खाली दिसणारी लिंक कॉपी करुन घ्या. ती तुम्हाला हवी तिथे पेस्ट करुन ठेवा.
- आता त्याच विंडोमध्ये बातमीच्या इमेजवर क्लिक करा.
- आता आणखी एक नवी विंडो दिसेल. त्यात download, facebook, twitter, email असे विविध पर्याय दिसतील.
- यातील download क्लिक करा म्हणजे तुमचे डिजिटल कात्रण तुम्हाला मिळाले.
-
facebook, twitter, email वर क्लिक केले तर ही बातमी आपोआप तुमच्या facebook, twitter, email वर शेअर केली जाते.
-
वृत्तपत्राने ई-पेपरवर पीडीएफ फाईल शेअर केलेल्या असतात. तुम्ही डिजिटल कात्रण काढता ते jpeg स्वरुपातले असते, हे लक्षात ठेवा.
- आजच्यापेक्षा एखाद्याला मागील अंकातील बातमीचे/लेखाचे कात्रण हवे असेल, तर त्याने हवी ती आवृत्ती आधी उघडावी. मग कॅलेंडरच्या आयकॉनवर क्लिक करुन हव्या त्या तारखेचा अंक उघडावा आणि मग हवे ते पान उघडून वरीलप्रमाणेच कात्रण काढावे.
- कोणत्याही वृत्तपत्राच्या 27 जानेवारी, 2 मे, 16 ऑगस्ट आणि धुळवड, दिवाळी पाडव्याचा दुसरा दिवस या दिवसांच्या आवृत्त्या नसतात. कारण या दिवसांच्या आदल्या दिवसांना अंकाला सुट्टी असते.
- तुम्ही डाऊनलोड केलेल्या इमेजच्या तळाशी वृत्तपत्राचे नाव आणि तारीख दिसत आहे ना, याचीही खात्री अवश्य करा.