नवी दिल्ली – केवळ ओळखपत्र म्हणूनच नव्हे तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड असणे अनिवार्य बनले आहे. मात्र आधार कार्ड कागदी स्वरूपाचे असल्याने ते फार काळ टिकत नाही अशी अनेकांची तक्रार असल्याचं पाहायला मिळतं.
याखेरीज आधारला जोडलेला मोबाईल क्रमांक नसल्याने नवं आधार कार्ड मागवता येत नाही अशीही काहींची व्यथा असते. मात्र आता आधार कार्ड संबंधातील सरकारी संस्था युआयडीएआयने या दोन्ही समस्यांचे निराकरण केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावर्षी ऑक्टोबरमध्ये युआयडीएआयने आधार कार्ड पीव्हीसी स्वरूपात सादर केले आहे. पीव्हीसी स्वरूपातील हे नवे आधार कार्ड तुमच्या एटीएम वा पॅनकार्ड प्रमाणेच आहे. यामुळे तुम्ही पीव्हीसी आधार कार्ड मागवल्यास ते फाटण्याची काळजी आता राहणार नाही.
आता आधार कार्डबाबत सतावणारा दुसरा प्रश्न म्हणजे मोबाईल नंबर आधाराला जोडला नसल्याने आधार मागवता येत नाही. याही प्रश्नाची सोडवणूक युआयडीएआयने केली असून जर तुम्हाला पीव्हीसी स्वरूपातील आधार कार्ड मागवायचे असेल तर तुम्ही ते कोणताही मोबाईल क्रमांक वापरून मागवू शकता. होय, तुमचा क्रमांक आधारकार्डशी जोडलेला नसेल तरीही तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. कसं? जाणून घ्या खालील सोप्या स्टेप्समधून…
१) या लिंकवर क्लिक करा https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint
२) लिंकवर दिलेल्या पर्यायामध्ये तुमचा आधार क्रमांक, आभासी ओळख क्रमांक किंवा ईआयडी क्रमांक भरा.
३) तुमचा आधार क्रमांक आधारही जोडलेला असेल तर उत्तम, अन्यथा माझा नंबर आधारही जोडलेला नाही हा पर्याय निवडा.
४) जर तुमचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक जोडलेला असेल तर तुम्हाला पाठवण्यात येणाऱ्या आधार कार्डचा प्रिव्हिव्ह तुम्हाला ऑनलाईन दाखवण्यात येईल. आधार-मोबाईल क्रमांक जोडले नसल्यास प्रिव्हिव्ह पाहता येणार नाही.
५) मोबाईल क्रमांक भरल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी प्राप्त होईल. तो भरल्यानंतर तुम्हाला पीव्हीसी कार्डसाठीची ५० रुपये इतकी फी भरावी लागेल. फी भरल्यानंतर तुमचे आधार कार्ड तुमच्या आधार कार्डवरील पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे पाठवले जाईल.