मुंबई – पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता केवळ पाच दिवस उरले आहेत. म्हणजेच 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. आयकर कायदा 1961 कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो.
पॅन आधारशी लिंक न केल्यास दंड भरावा लागू शकतो. तसेच शेवटच्या तारखेपर्यंत लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 30 जूननंतर ते पॅन कार्ड आर्थिक व्यवहारात वापरलं जाणार नाही. म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट उघडणे, नवीन बँक खाते उघडणे पॅनशिवाय आपण या सर्व गोष्टी करू शकणार नाही. त्यामुळे ज्या नागरिकांनी ही प्रक्रिया केलेली नाही त्यांनी 30 जूनपर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक करावे.
असं तपासा पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक आहे का –
यासाठी तुम्हाला सर्वात आधी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट www.incometaxindiaefiling.gov.in म्हणजेच आता नवीन वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर जावे लागेल. खाली दिलेल्या लिंक आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आपलं स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा. नवीन विंडोवर पॅन आणि आधार तपशील भरा. तिथे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही तपासा आणि नसेल तर लगेच लिंक करा. तसेच जवळील ई-सुविधा केंद्रात जाऊन देखील पॅन-आधार लिंक करू शकता.