घरातल्या प्लॅस्टिकच्या वस्तू कशा जपाल?

सध्या जमाना आहे प्लॅस्टिकचा. वापरायला हलके, धुवायला सोपे, ने-आण करायला सोयीचे… अशा बहुपयोगी गोष्टींमुळे प्लॅस्टिकची क्रेझ वाढती आहे. पण होतं काय, की या वस्तूंची काळजी कशी घ्यावी हे आपल्याला माहित नसतं आणि मग त्या वस्तू आवडूनही आपल्याला लवकर फेकून द्याव्या लागतात. खिशालाही भुर्दंड बसतो. हे टाळण्यासाठी काय करता येईल?

या काही टिप्स…
या वस्तू अधिक लोकप्रिय होत असल्या, तरी या वस्तूंची मुख्य समस्या आता अधिक चर्चिली जाऊ लागली आहे. ती म्हणजे या वस्तूंमध्ये जी वस्तू ठेवाल, तिचा त्यानंतरही काही काळ वास येत राहतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या कोणत्याही भांड्यांत पदार्थ ठेवण्याआधी ते भांडे स्वच्छ धुवून घ्या. त्याला कोरड्या फडक्‍याने पुसून घ्या. त्यानंतरच कोणताही पदार्थ ठेवा. असे केल्याने तो पदार्थ खराब होण्याची भीती तर नाहीच, शिवाय त्या भांड्याचाही नंतर वास येणार नाही.

प्लॅस्टिकची भांडी धुण्यासाठी नेहमीच मध्यम स्वरूपाची डिटर्जंट वापरा. ज्यामुळे भांड्यांबरोबरच तुमच्या हातालाही त्रास होणार नाही. आणि या वस्तूंना घासण्यासाठी तारांची घासणी, किंवा जाडसर, रखरखीत पॅड वापरू नका. तसे केल्याने त्यावर ओरखडे उठतील आणि तुमच्या वस्तू लवकर खराब होतील.

ही भांडी किंवा डबे धुतल्यानंतर त्यांना एकदा व्हिनेगारमध्ये विसळून घ्या. त्यानंतर किमान तीन मिनिटे त्यात बुडवून ठेवा. त्यातून बाहेर काढल्यावर मग पुन्हा साबणाने धुवून घ्या व पाण्याने धुतल्यावर कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून ठेवा. असे केल्याने त्यातील दुर्गंधी जाईलच, शिवाय त्यामुळे त्यांचे आयुष्यही वाढून ती अधिक काळ टिकतील.

प्लॅस्टिकची भांडी धुतल्यानंतर तत्काळ स्वच्छ कपड्याने कोरडी करा, ज्यामुळे त्यावर पाण्याचे डाग राहणार नाहीतच, शिवाय त्यातून येणारा वासही निघून जाईल. बऱ्याच गृहिणी भांडी धुतल्यानंतर तशीच सुकत ठेवतात, ती पुसून ठेवत नाहीत. घाईमुळे ते शक्‍यही होत नसेल, पण दिवसातून किमान एकदा तरी भांडी धुतल्यानंतर पुसून स्वच्छ केली पाहिजेत.
या वस्तू धुतानाही काळजी घ्या. भांडी धुतल्यानंतर ती व्यवस्थित कोरडी झाली आहेत ना, याची खात्री करा. कारण बऱ्याचदा भांड्यांच्या आतील काही कोरा स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे अशा वस्तू लवकर निकामी होतात.

प्लॅस्टिकच्या छोट्या डब्यांमध्ये आपण काही वस्तू ठेवतो आणि त्या फ्रिजमध्ये ठेवतो. असे करताना फ्रिजमधल्या मोठ्या कंटेनरच्या भोवताली मीठाचा हलकासा फवारा मारा, ज्यामुळे फ्रिजमधल्या तापमानाचा या डब्यांवर किंवा त्यातील वस्तूंवर परिणाम होणार नाही.

प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचा. त्यावर त्या वस्तू धुण्यासंबंधी सूचना दिलेल्या असतात. त्यानुसार गरम पाणी, थंड पाणी अशा पर्यायांचा आपल्याला वापर करता येईल. त्यावर गरम पाणी वापरू नका लिहिले नसेल, तर तसे करू नका. कारण त्यामुळे डबा किंवा ती वस्तू खराब होईलच, पण त्यात ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंचीही वाट लागू शकते.

प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांबाबतही तुम्ही अशीच काळजी घेतली पाहिजे, कारण या बाटल्यांचा सध्या सर्वाधिक वापर होतो आहे. त्या आतून नीट स्वच्छ होत नाहीत. आणि त्याचा तुमच्या थेट आरोग्यावर परिणाम होतो. त्याबरोबरच प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये पदार्थ ठेवताना अशाप्रकारे ठेवा की त्यांचा आणि हवेचा संपर्क येता कामा नये. हवेतील धूलिकण आणि इतर घटक त्याला खराब करण्यास कारणीभूत ठरतील आणि छोटीशी चूक तुम्हाला तुमच्या आरोग्याशी खेळायला भाग पाडेल.

प्लॅस्टिकच्या वस्तूंची सर्वांत मोठी समस्या म्हणजे त्यांना उन्हाच्या संपर्कात येऊ देऊ नका. बऱ्याच गृहिणींना प्लॅस्टिकची भांडी धुतल्यानंतर ती उन्हात सुकवण्याची सवय असते. पण सूर्यप्रकाश जितका चांगला तितकाच प्लॅस्टिकसाठी तो घातकही आहे. त्यातून प्लॅस्टिकमध्ये उतरणारी किरणे जंतू घालवण्याऐवजी त्यात काही रसायने निर्माण करतात. त्यामुळे या गोष्टीचं भान आपण ठेवायलाच हवं, नाही का?

प्लॅस्टिकच्या वस्तू जेवढ्या वापरायला सोप्या, सुुलभ, तेवढ्याच त्यांची काळजी घेतली नाही, तर त्या धोकादायकही ठरू शकतात. पण योग्य काळजी घेतली, तर तुम्हाला त्या वरदानच ठरतील, यात शंका नाही.

– स्वरदा वैद्य

Leave A Reply

Your email address will not be published.