जवानांच्या शौर्यावर मत मागतात तरी कशी?

धनंजय मुंडेः “अच्छे दिन’ या घोषणेचा पूर्णतः फज्जा

जामखेड –
निवडणुकीत मत मागायला मुद्दा नाही, म्हणून जवानांच्या शौर्याचे भांडवल वापरले जात आहे. मात्र जवानांच्या शौर्यावर मत मागतांना यांना लाज कशी वाटत नाही,असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या “अच्छे दिन’ या घोषणेचा पूर्णतः फज्जा उडाला असल्याची टिकाही त्यांनी केली.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ जामखेड तालुक्‍यातील खर्डा येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी मुंडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहाजीराजे राळेभात, डॉ. कैलास हजारे, रमेश थोरे, महालिंग थोरे, अमजद पठाण, रमेश आजबे, शहाजीराजे भोसले, मधूकर राळेभात आदी उपस्थित होते.

आ. मुंडे पुढे म्हणाले, संकटात मोदींना पवारांचे बोट दिसते. मात्र तरीही ते पवारांनाच टीकेचे लक्ष करीत आहे. कारण शरद पवार कळायला त्यांना आणखी दहा जन्म लागतील. साडेचार वर्षांत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप नाही म्हणता मग हजारो कोटी बुडवून विजय मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी हे कसा पळून गेले, असा सवालही मुंडे यांनी केला. मोदींनी दिलेल्या आश्‍वासनाचे काय झाले. 2 कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देवून, देशाबाहेर गेलेला काळा पैसा भारतात आणू, प्रत्येकांच्या बॅंक खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करणार अशी आश्‍वासन दिली होती. परंतु त्यापैकी की आश्‍वासने त्यांनी पाळली हे आता जनतेने त्यांना विचारले पाहिजे, असे यावेळी मुंडे म्हणाले.

पंकजा मुंडे काय वारसा चालवताय?

भगवान गडावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊस तोडणी कामगार महामंडळ स्थापन करण्याची राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र साडेचार वर्षांत या महामंडळाचे कार्यालयही अस्तित्वात आले नाही. काही कारणास्तव हे मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि दुर्दैवाने पंकजा यांनीही सरकारच्या त्या निर्णयाला सही करून सहमती दर्शविली. स्व. मुंडे साहेबांचा तुम्ही हा असा वारसा चालवताय का, असा प्रश्‍न आ. मुंडे यांनी उपस्थित केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.