संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात करोनाचा कहर कसा – राजू शेट्टी

कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे. जर संघाने धारावी करोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात करोनाचा कहर कसा, तिथला करोना अटोक्‍यात का नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, धारावीत करोनाचा हाहाकार माजला होता. करोनामुळे किड्या-मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती. त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत, असे एक वृत्तही वाचनात, पाहण्यात आले नाही. मात्र, डब्ल्यूएचओने जेव्हा सांगितलं धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले.

माझ्या मनात एक छोटीशी शंका आहे, संघाचे हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही करोनाचा हाहाकार आहे, तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही. कारण मी तर कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इचलकरंजीत करोनाचा हाहाकार आहे, अनेक शहरांत आहे. त्यामुळे संघस्वयंसेवकांनी तिथे जावे, त्यांनी जीव धोक्‍यात घालून संपूर्ण महाराष्ट्रात करोनामुक्तीचे काम करावे, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल, असा टोलाही त्यांनी लगाविला.

Leave A Reply

Your email address will not be published.