तुमच्या चिमुकल्यांना शाळेत टाकण्याचं वय किती असावं? ; शिक्षण विभागाचा निर्णय

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित : प्रवेशावेळचा गोंधळ थांबणार

पुणे – राज्यातील शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. यात प्ले ग्रुप किंवा नर्सरीच्या प्रवेशासाठी तीन वर्षे, तर इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असे किमान वय असणे आवश्यक आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

राज्य शासनाच्या 11 जून 2010 च्या निर्णयानुसार शाळा प्रवेशाबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. यातील तरतूदीनुसार इयत्ता पहिलीमधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा सहा वर्षे निश्चित केली होती. मात्र पाच वर्षे पूर्ण झालेले बालकही पहिलीच्या प्रवेशासाठी पात्र राहतील असे नमूद करण्यात आले होते. राज्यात राज्य मंडळ, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., आय.बी. अशा विविध प्रकारच्या अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये प्रवेशासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते. पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. यावरुन मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होत असल्याचे प्रकार दरवर्षी घडत असल्याचे उघडकीस आले होते.

शाळा प्रवेशाबाबत एकवाक्यता आणण्यासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार 21 जानेवारी 2015 व 23 जानेवारी 2015 रोजी शुध्दीपत्रक काढण्यात आले होते. 31 जुलै हा मानिव दिनांक गृहीत धरुन बालकांचे किमान वय पूर्व प्राथमिकसाठी तीन वर्षे पूर्ण व पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर 25 जानेवारीच्या 2017 च्या निर्णयानुसार शाळा 30 सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आला होता. बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकारही मुख्याध्यापकांना देण्याचा निर्णय 25 जुलै 2019 रोजी घेण्यात आला होता.

प्राथमिक शिक्षण संचालकांनी बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. आता शासनाने नव्याने आदेश काढून शाळा प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित करुन 31 डिसेंबर हा मानिव दिनांक घोषित केला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी शिथिलता मिळणार नाही. राज्यातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आदेश लागू राहतील, असे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढलेल्या आदेशाद्वारे स्पष्ट होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.