मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला लाखोंच्या संख्येत जनतेकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा मविआकडून केला होता.त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘नॅनो’ मोर्चा म्हणून विरोधकांवर टीका केली. त्यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच व्हिडीओवरून आता सत्ताधारी नेत्यांकडून राऊतांवर निशाणा साधण्यात येत आहे.
संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत भगवे झेंडे हातात घेतलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी महामोर्चात आलेल्या लोकांनी केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. मात्र या व्हिडीओवर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो, असे फडणवीसांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.
सर्वज्ञानींना आता काय म्हणावं ?
अजून किती उघडे पडाल ?परवा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अज्ञानानं तोंडघशी पडले ते काही कमी झालं नाही तर आता चक्क नॅनो मोर्चाचं अपयश झाकायला थेट मराठा मोर्चाचा आधार घेतला? (१/२)@rautsanjay61 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @cbawankule pic.twitter.com/wEbOU5Neqj
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 18, 2022
“सर्वज्ञानींना आता काय म्हणावं?, अजून किती उघडे पडाल? परवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अज्ञानानं तोंडघशी पडले ते काही कमी झालं नाही. तर आता चक्क नॅनो मोर्चाचं अपयश झाकायला थेट मराठा मोर्चाचा आधार घेतला?” असं चित्रा वाघ यांनी ट्वाट केले आहे.
याशिवाय, “अहो सर्वज्ञानी संजय राऊत मविआ मोर्चा म्हणून तुम्ही पोस्ट केलेला व्हीडिओ तरी निदान पहा. हा आहे २०१७ चा मराठा समाजाचा खरा विराट मोर्चा. देवेंद्र फडणवीसांची टीका खरी होती म्हणून काय थेट अशी सारवासारव? हा तर मराठा समाजाचाही अपमानंच.” असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.