मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकरांवर खोचक टीका केली आहे. “ज्यांचं डिपॉझिट वाचत नाही त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभा राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय”, असे अजित पवार म्हणाले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी इथल्या अहिल्यामाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. मात्र या पुतळ्याचे अनावरण उद्या १३ फेब्रुवारीला शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होते. मात्र त्यापूर्वीच पडळकरांनी हे अनावरण उरकून घेतले. त्याचवेळी त्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका केली. त्याबाबत अजित पवारांना विचारण्यात आला.
अजित पवार म्हणाले, “अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही, उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय” असा खोचक सवाल देखील यावेळी पवार यांनी केला.
दरम्यान, जेजुरीमधील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण गोपीचंद पडळकर यांनी उरकुन टाकले. मात्र हे करत असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याचाच समाचार अजित पवार यांनी घेतला आहे.