24 तारखेला कळेलचं अठराशेवर किती शून्य असतात…!

शंभूराज देसाई यांचा नाडे येथील प्रचारसभेत प्रतिटोला
सणबूर –
आम्ही गेल्या पाच वर्षांत अविरत काम करून जनतेने दिलेल्या संधीचे सोने केले आणि तब्बल 1800 कोटी रुपयांचा भरघोस विकासनिधी आणला. मात्र आमचे विरोधक म्हणतात 1800 कोटींवर किती शून्य असतात हे संसदपट्टूंना माहीत आहेत का? अशा बालिश सवाल करणाऱ्या विरोधकांना येत्या 24 तारखेला कळेल आठराशेवर किती शून्य असतात ते…! असा प्रतिटोला आमदार शंभूराज देसाई यांनी लगावला.

ते नाडे येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी विजय पवार, विष्णू पवार, जयवंत पवार, बबनराव भिसे, डॉ. प्रदीप पवार उपस्थित होते.
देसाई म्हणाले, पाच वर्षे घरात बसून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या आणि केवळ निवडणूक आली की जनतेच्या दारात जाऊन सर्वसामान्य जनतेची बुद्धिभेद करणाऱ्यांनी गत पाच वर्षात काय केले? याचे उत्तर द्यावे.

आपल्या विकासकामांची मापे काढण्याचा उद्योग विरोधकांचा सुरु आहे. पाच वर्षात कधी वाड्याबाहेर न पडणारे विरोधक आता मते मागायला गावागावात फिरत आहेत हे तालुक्‍याचे दुर्दैव आहे. गाव तेथे विकास करण्याचे ध्येय आपण बाळगल्यामुळेच गत पाच वर्षात पाटण मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी आपण मंजूर करुन आणू शकलो.

माजी आमदार आणि त्यांचे सुपुत्र केवळ पोकळ गप्पा मारण्यात पटाईत आहेत. गतवेळी जनतेने आपणाला तब्बल 18 हजाराचे मताधिक्‍य दिले आणि आम्ही जनतेने आपणावर टाकलेल्या या प्रचंड विश्वासाला तडा न जाऊ देता मिळालेल्या संधीचे आपण सोने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्‍चितच केला असल्याचे ते म्हणाले. पाटणचा आणखिन गतिने विकास करण्याकरीता मला पाठबळ द्यावे तसेच लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनाही मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तर एवढा विकास निधी आलाच नसता..!

स्वतःला युवा नेते समजणारे ऐन पूर परिस्थितीत तालुक्‍यातील जनतेला पुराच्या वेढ्यात सोडून परदेशवाऱ्या करीत फिरत होते.आम्ही यांच्यासारखे फिरत राहिलो असतो तर मतदारसंघात 18 हजार कोटींची विकासकामे उभीच राहिली नसती, असा टोला देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांचे नाव न घेता लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.