मी किती चक्रम, ते पंधरा दिवसांत दिसेल

रामराजे : छत्रपतींचा पाण्याशी कितपत संबंध येतो, हे सर्वांना माहीत आहे 

फलटण – जिल्ह्यातील तीन चक्रम ठरवून सर्किट हाऊसला काल दुपारी एकत्रित आले. पण मी किती चक्रम आहे, ते येत्या 15 दिवसांत दिसेल, असे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. मला स्वयंघोषित भगीरथ म्हणणारे स्वयंघोषित छत्रपती असून त्यांचा पाण्याशी कितपत संबंध येतो, हे सर्वाना माहीतच आहे. दहा वर्षात पाण्यासाठी त्यांनी तोंड उघडलेले आठवत नाही, असा घणाघात त्यांनी केला येथील अनंत मंगल कार्यालयात नीरा देवघर पाणी प्रश्‍नाबाबत आयोजित शेतकरी कार्यकर्त्यांच्या बैठकीत रामराजे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उतपन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक साळुंखे, पंचायत समिती सदस्य विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील तीन चक्रम एकत्र आले असले तरी मी तोंड द्यायला समर्थ आहे. त्यांना डोकं नाही मी तुमच्यापेक्षा किती महाचक्रम आहे, हे 15 दिवसांत कळेल, असा इशारा देतानाच रामराजेंनी आमदार गोरे घरात घ्यायच्या लायकीचे नाहीत, ते कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत ते बघा. आमच्या भविष्याची चिंता नका करू, तुमचे क़ाय होतेय ते बघा, असा टोला लगावला. सातारचे छत्रपती मला स्वयंघोषित भगीरथ म्हणत असतील तर तेही स्वयंघोषित छत्रपती आहेत. निवडणूक काळात मला गुरू म्हणणारे निवडून आल्यावर माझ्यावर उलटत आहेत. रणजीतसिंह हे बारामतीकरांना नावे ठेवतात. मात्र, त्यांना बारामती बैंकेचे कर्ज चालते.

या कर्जासाठी पवारांचे कितीवेळा उंबरठे झिजविले, हे आम्हाला माहीत आहे. बारामतीकरांना नावे ठेवणे हा त्यांचा विरोधाभास असून साधी स्वतःच्या कारखान्याची एफआरपी देता येते का बघा, असे त्यांनी सांगितले. ऊंटावरुन नव्हे तर गाढ़वावरून मिरवणूक काढायला पाहिजे होती, अशी खिल्लिही त्यांनी उडविली. असल्या लोकांच्या नादी लागू नका मी कधीही पाण्यासाठी राजकारण केले नाही, कोणावर अन्याय केला नाही, असे रामराजेनी सांगितले ते म्हणाले, कृष्णा खोऱ्याची स्थापना आपणच करायला लावली.

निरा देवघरचे धरण मीच बांधले. कालव्यांची कामे अपूर्ण असताना त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अवतीभवती असणाऱ्या आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी का निधी आणला नाही, का त्यावेळी बारामतीचे पाणी वळविले नाही, असा सवाल करून सध्या घाणेरडे राजकारण सुरू असून सातारच्या खासदारानी दहा वर्षात क़ाय केले, किती प्रश्‍न विचारले, हे त्यांना सांगता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.