मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. यादरम्यान राज्यात कुणाची सत्ता येणार याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
जे कोणाचे सर्व्हे येत आहेत त्याच्यावरती फार विश्वास ठेवावा अशी काही परिस्थिती नाही आहे. लोकसभेला देखील सर्व्हे आले होते, महाविकास आघाडीला जागा मिळणार नाही, पण आम्ही प्रत्येक्षात राज्यात 31 जागा जिंकलो. महायुतीचे लोक कुठूनही सर्व्हे करून घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. मी आपल्याला सांगत आहे की आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.
भाजपवर केली टीका
तसेच त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे लोक चोऱ्या-माऱ्या करून जागा जिंकतात त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सावध राहायला सांगितलं आहे. आता जे सरकार आहे, ते चंद्रचूड यांच्या कृपेने किंवा पंतप्रधान मोदी, शहांच्या कृपेने बसलेले आहे. ते पुन्हा निवडून येणार नाही याची आम्हाला खात्री आहे.