नवी दिल्ली – वापरात असलेल्या 2 हजाराच्या नोटा परत घेतल्या जाणार असल्याची घोषणा 19 मे 2023 रोजी करण्यात आली होती. या प्रक्रियेची सुरूवात 23 मे पासून झाली असून 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजारच्या नोटा जमा करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत 1.80 लाख कोटी मूल्याच्या नोटा परत आल्या असल्याची माहिती रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. 31 मार्च 2023 पर्यंत बाजारात दोन हजारच्या जेवढ्या नोटा होत्या त्याच्या हे पन्नास टक्के आहे.
85 टक्के नोटा थेट बॅंक खात्यात जमा केल्या जात आहेत. आमची जशी अपेक्षा केली होती तसेच हे होते आहे आणि बॅंकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी गर्दी उसळली अथवा लोकांमध्ये भीती निर्माण झाली वगैरे प्रकार घडलेले नाहीत. नोटा जमा करण्यासाठी आणि बदलून घेण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात आली असल्यामुळे गडबड करण्याचे कोणते कारण नाही. आरबीआयकडे चलनाचा पुरेसा साठा आहे. लोकांनी वेळ काढून आपल्या सोयीने नोटा बदलून घ्याव्यात. पण प्रत्येक गोष्टीसाठी शेवटपर्यंत वाट पाहायची आणि मग धावपळ करायची ही आपल्याला सवय असते. त्यामुळे नोटा जमा करायची मदत संपत आली असताना शेवटच्या दहा पंधरा दिवसांत एकदम गोंधळ उडायला नको असा सल्लाही शक्तिकांत दास यांनी दिला.
दरम्यान, आता 2 हजारच्या नोटा परत घेतल्या जात आहेत. तर मग 1 हजारची नोट पुन्हा आणणार का किंवा 500 ची नोटही मागे घेण्याचा सरकारचा विचार आहे का असा प्रश्न दास यांना विचारण्यात आला. त्यावेळी माझ्याकडे याची कोणतीही माहिती नाही. तसेच असा कोणता विचारही नाही. नागरिकांनी असे काही अंदाज बांधू नयेत असा सल्लाही त्यांनी दिला.