पुणेः नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकातील प्लॅटफॅार्म क्रमांक १४ आणि १६ वर १५ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरीच्या दुर्घेटना घडली. या दुर्घेटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांमध्ये बिहार राज्यातील भाविक अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या दुर्घेटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सामील होण्यासाठी भावकांची मोठ्या प्रमाणावर दिल्ली रेल्वे स्थानकात गर्दी केली होती. या गर्दीमुळे मोठा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची दुर्घेटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्घेटनेनंतर भाविकांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या दुर्घेटनेबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॅा. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आंबेडकर यांनी या दुर्घेटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या प्रति आपले दु:ख व्यक्त केले आहे. अजून किती निष्पाप लोकांना अशा पद्धतीने मरावे लागणार आहे, असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी द्यावे, असे आंबेडकर म्हणाले.
सुरक्षित प्रवास करण्यासाठी पुरेशा सुविधा देऊन ज्या ट्रेन आपल्याकडे आहेत, त्यातच सुधारणा करावी, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे. हा अपघात म्हणजे रेल्वेची अतिशय बेजबाबदार आणि सामान्य प्रवाशांबाबत असलेली गैरव्यवस्था असल्याचे देखील ते म्हणाले. चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला, त्यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॅार्म क्रमांक १४ आणि १६ वर १५ फेब्रुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजला जाणारी रेल्वेत बसण्यासाठी दाखल झाले होते. यामुळे येथे भाविकांची मोठी गर्दी उसळली परिणामी चेंगराचेंगरीची घटना घडली. अचानक वाढलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतीच यंत्रणा येथे नसल्याने ही चेंगराचेंगरी दुर्घेटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत आतापर्यंत १८ भाविकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.