करोनाग्रस्त नागरिकांचे आणखी किती खिसे कापणार?

  • पुण्यात बिलांचा आकडा ‘वाढीव’च
  • खासगी हॉस्पिटल्स नियमांना जुमानत नसल्याचा प्रकार
  • आतापर्यंत सव्वादोन कोटी रुपयांचा रुग्णांना परतावा

पुणे -पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील खासगी हॉस्पिटलकडून अजूनही वाढीव बिले करोना रुग्णांच्या माथी मारण्याचे प्रकार सुरुच आहे. शासनाने खासगी रुग्णालयांना नियमानुसार बिले आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी, खासगी हॉस्पिटल्सकडून जादा बिले आकारली जात आहे.

 

मागील आठ दिवसांत खासगी हॉस्पिटलने 67 लाख 63 हजार 989 रुपयांचे जादा बिल समाविष्ट केल्याचे समोर आले आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 2 कोटी 23 लाख 90 हजार 827 वाढीव बिलाची रक्कम कमी करण्यात आली आहे. अशी वाढीव बिले आकारणाऱ्या हॉस्पिटलविरुद्ध प्रशासनाने आता तरी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

करोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्याच्या गैरप्रकारला आळा बसण्यासाठी खासगी हॉस्पिटलनी दिलेल्या दीड लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांची पूर्व तपासणी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यासाठी दोन्ही शहराबरोबरच ग्रामीण भागातील हॉस्पिटलसाठी बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली. महापालिकेतील लेखा विभागातील अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली. दीड लाखांपेक्षा अधिकचे बिल हे हॉस्पिटलकडून लेखापरीक्षण पथकाला दिले जाणार जाते. या बिलांचे तपासणी केल्यानंतर जादा दर आकारण्यात आले असेल, तर त्याबाबतचे म्हणणे रुग्णालयांकडून मागविले जाते. आकारलेले बिल योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते बिल रुग्णांना अथवा नातेवाईकांना दिले जाते. यामध्ये ही बाब समोर आली.

 

पुणे जिल्ह्यात वाढीव बिलाच्या एकूण 1 हजार 162 तक्रारी आल्या होत्या. या 1 हजार 162 बिलांची एकूण 14 कोटी 75 लाख 69 हजार 611 रुपये होती. या सर्व सर्व बिलांची छाननी लेखा पथकांकडून करण्यात आली. त्यामध्ये 2 कोटी 23 लाख रुपयांचे जादा बिल रुग्णालयाने आकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ही जादा बिले रुग्णांच्या बिलातून कमी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.