पुणे – आपली कंपनी महिन्याला करोना प्रतिबंधक लसीचे प्रत्येक महिन्याला सात ते आठ कोटी डोस तयार करू शकते आणि भारत आणि अन्य देशांना किती डोस द्यायचे याचे याचे व्यापक नियोजन सुरू आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली.
भारत आणि अन्य देशांना किती डोस द्यायचे याचे याचे धोरणात्मक नियोजन आरोग्य मंत्रालय करत आहे. आम्ही खासगी ट्रक, व्हॅन आणि शीतगृहांशी भागीदारी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट अफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांना करोनावरील लस पुरवणार आहे, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले.
सीरममध्ये तयार झालेली लस आपल्याला पुरवावी, अशी विनंती अनेक देशांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. आम्ही सर्वाना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमच्या नागरिकांची आणि देशाचीही काळजी घेऊ. अफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेलाही लस आम्हाला द्यायची असल्याने आम्ही सर्वत्र थोडेफार उत्पादन घेऊ, अशी पुस्तीही पुनावाल यांनी जोडली.
देशातील प्रत्येकाला लस देणे हे आव्हान आहे. आणि हेच आव्हान 2021 चेआहे. आमच्या कारखान्यातून लस जात असल्याचा क्षण आमच्यासाठी ऐतिहासिक होता. देशातील प्रत्येकाला लस देणे, हे आमच्यापुढचे आव्हान आहे. पाहू या ते कसे पार पडते, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या विनंतीवरून आम्ही पहिले एक कोटी डोस 200 रुपयांना देणार आहोत. त्यानंतर भारत सरकारसाठी आम्ही अत्यंत माफक किंमत आकारणार आहोत. ही किंमत दोनशे रुपयांपेक्षा काहीशी अधिक असेल. त्यामुळे पहिल्या दहा कोटी डोसपर्यंत कोणताही नफा स्वीकारायचा नाही. आम्ही देशाला केंद्र सरकारला पठिंबा द्यायचे धोरण आखले आहे.