सैनिकी शाळांना माहिती देण्याचे प्रभारी शिक्षण उपसंचालकांचे आदेश
पुणे – राज्यातील सैनिकी शाळांमधून शिक्षण घेतलेल्या मुलांपैकी किती मुलांची सैन्यदलात निवड झाली, याची माहिती त्वरित सादर करा, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातील प्रभारी शिक्षण उपसंचालक ज्योती शिंदे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना बजाविले आहेत.
मागील पाच वर्षांत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेशासाठी सैनिकी शाळेतून किती विद्यार्थ्यांची निवड झाली, किती मुले सैन्यदलात अधिकारी म्हणून भरती झाली. याबाबतचा आढावा घेण्याचे शासनाने निर्देश दिले आहे.
त्यानुसार शासनास आवश्यक असलेली माहिती सादर करण्याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ठाणे, रायगड, गोंदिया, वाशिम, मुंबई वगळून इतर कोणत्याही जिल्ह्यातील सैनिकी शाळेची माहिती अद्याप संचालनालयास प्राप्त झालेली नाही. ही बाब गंभीर आहे.
सर्व जिल्ह्यातील माहिती प्राप्त न झाल्याने शासनाकडे माहितीच सादर करण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने अपेक्षित माहितीचा तपशील, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य शासनाच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. या संदर्भात मुख्य सचिव कार्यालयामार्फत वेळोवेळी आढावा घेण्यात येत असतो. त्यामुळे माहिती सादर न केल्याने मुख्य सचिव कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर पुन्हा अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.