कर्नाटकातील सरकार किती काळ चालेल सांगता येत नाही – देवेगौडा

बंगळुरू: कर्नाटकातील जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकारच्या स्थीरतेबद्दल जेडीएसचे प्रमुख माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनीच शंका व्यक्त केली आहे. हे सरकार किती काळ चालेल हे सांगता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की हे सरकार किती काळ चालवायचे आहे याचा निर्णय कॉंग्रेसने घ्यायचा आहे. आमच्या बरोबर आघाडी करून सरकार चालवण्याची सुचना कॉंग्रेसनेच केली होती असे त्यांनी म्हटले आहे.

देवेगौडा म्हणाले की कुमारस्वामी यांनी हे सरकार व्यवस्थीत चालवे यासाठी सर्व शक्‍य ते प्रयत्न केले आहेत. आम्ही आमच्या कोट्यातील एक कॅबिनेट मंत्रीपद कॉंग्रेसला देऊ केले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कर्नाटकात लवकरच मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, त्या विषयी आता शंका राहिलेली नाही असेही महत्वाचे विधान त्यांनी यावेळी केले. त्यामुळे हे सरकार आता जास्त काळ चालणार नाही असेही त्यांच्या विधानांवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मात्र हे सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल असे म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की माध्यमांनी आपल्या वडिलांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कर्नाटकातील कॉंग्रेसेच प्रमुख सिद्धरामैय्या यांनी काल दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन कर्नाटकातील आघाडी तोडण्याची सुचना त्यांना केली. जेडीएसशी आघाडी केल्याने कॉंग्रेसच्या हिताला कर्नाटकात बाधा येत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.