Republic day 2025 | दरवर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त प्रमुख पाहुणे आमंत्रित केले जातात. 1950 पासून भारतात प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी आमंत्रित करण्याची परंपरा सुरू झाली आहे. यंदा इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येतील.
याअगोदर 26 जानेवारी 1950 रोजी इंडोनेशियाचेच राष्ट्रपती सुकर्णो हे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर 2011 मध्ये पुन्हा इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुसिलो बामबांग युधयोनो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. मात्र भारताचे प्रमुख पाहुणे कसे निवडले जातात आणि यांची कोण निवड करतात? याची माहिती जाणून घेऊयात.
प्रमुख पाहुणे प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यांच्या सन्मानार्थ 21 तोफांची सलामी दिली जाते. राष्ट्रपती भवनात त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. त्यांच्यासाठी भारताचे राष्ट्रपती विशेष स्वागत समारंभ आयोजित करतात. त्याशिवाय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांच्यासह भारतातील प्रमुख नेते त्यांच्यासोबत संवाद साधतात. त्यामुळे मुख्य अतिथीला दिला जाणारा सन्मान विशेष मानला जातो. या सन्मानासाठी पात्र पाहुणे निवडण्यासाठी एक सखोल प्रक्रिया पार पडते. Republic day 2025 |
प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुण्यांची निवड प्रक्रिया कशी असते?
भारतात प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे निवडण्याची प्रक्रिया कार्यक्रमाच्या ६ महिने आधी सुरू होते. प्रमुख पाहुणे निवडताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. जसे की, त्या देशाशी भारताचे संबंध कसे आहेत. तेथील लष्कर, राजकीय, आर्थिक दृष्ट्या भारताशी कसे संबंध आहे? अशा सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून परदेशी पाहुण्याचे नाव निश्चित केले जाते. त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम परराष्ट्र मंत्रालयाकडून केले जाते.
प्रबोवो सुबियांतो यांचा भारत दौरा महत्त्वाचा
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्या भेटीदरम्यान भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील ब्रह्मोस कराराला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदीबाबतचा 450 मिलियन डॉलरचा करार या दौऱ्यात अंतिम होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या खरेदीसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे.
हा करार सुलभ करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया इंडोनेशियाला कर्ज देण्याची तयारी करत असून ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचा भारत दौरा अनेक कारणांनी महत्त्वाचा मानला जात आहे. Republic day 2025 |
दरम्यान, गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि 2023 साली इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी भारताला भेट दिली होती. यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो असून ते 25 आणि 26 जानेवारीला भारतात उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा :
स्पोक नसलेले टायर! ‘ही’ हटके इलेक्ट्रिक सायकल पाहून पंतप्रधान मोदीही झाले चकित, पाहा व्हीडिओ