कोल्हापूर / प्रतिनिधी: संघ स्वयंसेवकांवरुन आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भाजप आमने-सामने आली आहे. जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संघ स्वयंसेवकांवरुन रविवारी एक वक्तव्य केलं होतं. त्यावर शेट्टी यांनी चांगलीच टीका केलीय.
राजू शेट्टी म्हणाले, मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत कोरोनाचा हाहाकार सुरू होता, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्य करत असल्याचं एकही बातमी आली नाही.
मात्र, जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जेव्हा सांगितलं धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले. यांच्या दाव्याप्रमाणे धारावीत संघ स्वयंसेवकांनी काम केले असेल तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही, कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही.
धारावी कोरोनामुक्तीचं सर्व श्रेय सरकारचं नाही, संघ स्वयंसेवकांचंही : चंद्रकांत पाटील
मुंबईतल्या धारावीमध्ये कोरोना विरुद्ध काम करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घराघरांमध्ये जाऊन स्क्रिनिंग केले आहे. त्यामुळे केवळ सरकारने याचं श्रेय घेऊ नये, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.
ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याचे कौतुक केले पाहिजे. मात्र, ज्या चुकीच्या आहेत त्यावर टीका करायची नाही का? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.